ऑनलाइन लोकमत
जयूपर, दि. १८ - भारतातील सर्वात प्रसिद्ध 'मछली' वाघीणीचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. राजस्थानच्या रणथंबोर उद्यानातील 'मछली' वाघीण ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती, तिने खाणेपिणेही सोडले होते. अखेर गुरूवारी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
रणथंबोरची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली 'मछली' ३० मे रोजी २० वर्षांची झाली होती. सामान्यत: वाघांचे आयुष्य हे १० ते १५ वर्षांचेच असते, मात्र 'मछली' २० वर्ष जगली.
जगातील 'मोस्ट फोटोग्राफ्ड' अर्थात सर्वाधिक फोटो काढली गेलेली वाघीण अशी मछलीची ख्याती होती. आहे. तसेच ती राणी माँ, रणथंबोरची राणी म्हणूनही नावाजली गेली होती. तिच्यावर अनेक डॉक्युमेंट्रीजही तयार झाल्या. विशेष म्हणजे तिला जीवनगौरव पुरस्कारही मिळाला होता. तिला पाहण्यासाठी राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी होती.