ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - भारतात शरण येऊन तपासात सहकार्य करणा-या याकूब मेमनला फाशी देण्याचा निर्णय अयोग्य असून याकूबला फाशी होत असेल तर बाबरी मस्जिद पाडणा-यांनाही फाशीची शिक्षा द्यायला हवी अशी वादग्रस्त मागणी एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.
याकूब मेमनच्या फाशीवर बुधवारी सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले असून याकूबला उद्या सकाळी सात वाजता फाशी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी याकूबच्या फाशीला विरोध दर्शवला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय निराशाजनक आहे, याकूबला राजकीय पाठबळ नसल्यानेच त्याला फाशी दिली जात आहे असा आरोप ओवेसी यांनी केला आहे. याकूबला फाशी देऊन बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या २५० जणांना न्याय मिळणार असेल तर बाबरी मस्जिद पाडल्यावर झालेल्या दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्या ९०० जणांना न्याय कधी मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बाबरी मस्जिद पाडणारे आता सत्तेत बसले असून त्यांनादेखील फाशी व्हायला हवी असा पुनरुच्चारही त्यांनी केला.