बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत 1000 जवान तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 02:33 PM2023-09-07T14:33:32+5:302023-09-07T14:34:14+5:30
धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात क्विक अॅक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
गेल्या काही काळापासून भारतात लोकप्रिय झालेले बागेश्वर धामचे कथावचक धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील खुराई येथे धीरेंद्र शास्त्री यांचा तीन दिवसीय कथावाचनाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेशी संबंधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 1000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी क्विक रिस्पॉन्स फोर्स जवानही तैनात करण्यात आले आहेत. या कथेच्या कार्यक्रमाला शेवटच्या दिवसापर्यंत लाखोंच्या संख्येने लोक पोहोचण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका व्यक्तीने धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने सोशल मीडियावरद्वारे ही धमकी दिली होती. प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या तरुणाला तात्काळ अटक केली. तरुणाच्या कुटुंबीयांना त्याच्या अटकेची माहिती मिळताच त्यांनी त्याच्या कृत्याबद्दल दु:ख व्यक्त केले आणि जाहीर माफी मागितली. यानंतर तरुणाला जामीन मिळाला. पंडित धीरेंद्र शास्त्री यांना यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. यामुळेच त्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाला कोणत्याही प्रकारे गाफील राहायचे नाही.