तिरुवनंतपुरम : केरळचेमुख्यमंत्री पिनराई विजयन यांना राज्याच्या पोलीस मुख्यालयात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. बुधवारी सायंकाळी पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला फोन करून एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या पोलीस मुख्यालयात एका अल्पवयीन मुलाने हा कॉल केल्याचे काही प्रसार माध्यामांतून सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, पोलीस सर्व पैलूंचा तपास करत आहेत. तसेच, या घटनेच्या संदर्भात म्युझियम पोलिस स्टेशनमध्ये धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेल्या फोन नंबरविरुद्ध केरळ पोलिस कायद्याच्या कलम ११८ (बी) आणि १२० (ओ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलम ११८ (बी) हे जाणूनबुजून अफवा पसरवणे किंवा पोलीस, अग्निशमन दल किंवा इतर कोणत्याही अत्यावश्यक सेवेची दिशाभूल करण्यासाठी खोट्या सूचना देणे आणि कलम १२० (ओ) हे दूरसंचारच्या कोणत्याही माध्यमाद्वारे एखाद्या व्यक्तीला वारंवार कॉल किंवा निनावी कॉल करणे, पत्र, लेखन, मेसेज, ई-मेल करणे याशी संबंधित आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी केरळमधील एर्नाकुलम येथे एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेदरम्यान बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या स्फोटांची जबाबदारी डॉमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने घेतली आहे. स्फोटांनंतर काही तासांनंतर, डॉमिनिक मार्टिनने त्रिशूर जिल्ह्यातील कोडकारा पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. याप्रकरणी तपास पोलीस करत आहेत.