एस. पी. सिन्हा -
पाटणा : बिहारमध्ये दारूविक्रीवर बंदी असली तरी लोकांचे दारू पिणे थांबलेले नाही. त्यातूनच नुकत्याच उद्भवलेल्या विषारी दारूकांडात सिवान, छपरा जिल्ह्यातील १६ गावांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. विषारी दारूमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल त्या राज्याचे दारूबंदी खात्याचे मंत्री रत्नेश सदा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दारूमाफियांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
विषारू दारू प्रकरणातील ४९ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दारूमुळे सातजणांनी दृष्टी गमावली आहे. सिवान येथील रुग्णालयातून काही जणांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे.
सरकारचा धाक उरला नाही : राहुल गांधी- बिहारमध्ये विषारी दारूमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला ही घटना खूपच वेदनादायी आहे. दारूबंदी करूनही बिहारमध्ये अशा घटना घडतात.- याचे कारण अवैधरीत्या दारू बनविणाऱ्या समाजकंटकांना राज्य सरकारचा धाक राहिलेला नाही असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले.- या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी असे गांधी यांनी सांगितले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या की, बिहारमध्ये दारूबंदी असूनही अवैध दारूचा व्यापार जोरात आहे. त्यातून दुर्घटना घडत आहेत.