बँकॉक : येथून १५५ कि.मी. उत्तरेस असलेल्या कोरात शहरातील एका मॉलमध्ये बेछूट गोळीबार करून २६ निरपराधांचे बळी घेणाऱ्या माथेफिरू सैनिकास थायलंडच्या सुरक्षादलांनी रविवारी सकाळी ठार करून तब्बल १७ तास सुरू असलेले मृत्यूचे तांडव थांबविले. मृतांमध्ये १३ वर्षांच्या एका मुलासह अनेक नागरिक व सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. आणखी ५७ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी या हल्लेखोराचे नाव जकरापंथ थोम्मा, असे असल्याचे जाहीर केले. तो थायलंडच्या लष्करात सार्जंट मेजर या हुद्यावर होता. त्याने घरासाठी घेतलेल्या कर्जावरून झालेल्या वादातून हे राक्षसी कृत्य केले, असे थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांनी सांगितले. प्रयुत पूर्वी लष्करप्रमुख होते.
थायलंडच्या दृष्टीने ही घटना अभूतपूर्व आहे, असे सांगून पंतप्रधानांनी याची कदापि पुनरावृत्ती होऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा शस्त्रधारी सैनिक शनिवारी दुपारी आधी लष्करातील एका वरिष्ठ अधिकाºयाच्या घरी गेला. तेथे त्याने तिघांना ठार केले. नंतर त्याने लष्कराचे एक चिलखती वाहन पळविले. ते घेऊन तो शहरातील लष्करी छावणीतील शस्त्रागारात गेला. तेथील पहारेकऱ्यांना ठार करून त्याने शस्त्रागारातून एक एम ६० मशीनगन व अनेक रायफली पळविल्या.
ही सर्व शस्त्रे घेऊन जकरापंथ थोम्मा याने कोरात शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या ‘टर्मिनल २१’ या शॉपिंग मॉलकडे मोर्चा वळविला. बेछूट गोळीबार करीत त्याने मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या अनेकांना ठार केले. बंदूकधाºयाचा रुद्रावतार पाहून मॉलमधील ग्राहक व कर्मचारी सैरावैला पळू लागले. भीतीने प्राण कंठाशी आलेले शेकडो लोक इमारतीत मिळेल तो आडोसा शोधून दडून बसले. शनिवारी रात्रभर मॉलमधून बंदूकधाºयाचा व बाहेरून वेढा घातलेल्या सैनिकांचा गोळीबार सुरू होता. सुरक्षादलांनी शनिवारी सकाळी मॉलमध्ये घुसून हल्लेखोर बंदूकधाºयाला ठार केल्यानंतर रात्रभर अडकून पडलेल्या लोकांची सुटका झाली. (वृत्तसंस्था)
फेसबुकवर केले ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ या हल्लेखोराने लष्करी छावणीतून शस्त्रे पळविण्यापासून ते मॉलमध्ये बेछूट गोळबार करेपर्यंतच्या सर्व घटनांचे फेसबुकवर ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ केले. एवढेच नव्हे तर मॉलच्या इमारतीपुढे उभे राहून सेल्फी काढून तोही त्याने फेसबुकवर टाकला. त्याने फेसबुकवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये हा सैनिक बेछूट गोळीबार करीत फिरत असल्याचे व लोक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत असल्याचे दिसले. ‘माझ्या तावडीतून कोणी सुटू शकणार नाही’, असे सुरुवातीस ओरडणारा हा सैनिक नंतर ‘आता बंदुकीचा चाप ओढण्याचेही त्राण माझ्यात नाही’, असे म्हणत असल्याचेही या व्हिडिओमध्ये ऐकू आले.या घटनेचे नेमके गांभीर्य लक्षात आल्यानंतर फेसबुकने या हल्लेखोराने टाकलेले हल्ल्याचे सर्व व्हिडिओ व पोस्ट नंतर काढून टाकल्या.