पटणा - बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराचं कहर वाढलेला आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 96 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 20 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची मुजफ्फपूरमधील श्रीकृष्णा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाची पाहणी केली. हर्षवर्धन यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे आणि बिहारमधीलआरोग्यमंत्री मंगल पांडेयदेखील उपस्थित होते. या पाहणीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यातील आणि जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांनी योग्य त्या खबरदारी घेण्याचे आदेश दिले. सूत्रांच्या माहितीनुसार ज्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री रुग्णालयात पाहणी करत होते. त्या 4 तासाच्या वेळेत 3 मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे मंत्री आणि आरोग्य अधिकारी तेदेखील चिंतेत पडले.
अद्यापही 115 मुलांवर उपचार सुरु पाहणीदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मुलांच्या नातेवाईकांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे. सरकार कोणताही हलगर्जीपणा करत नाही. योग्य ती पावलं सरकार उचलत आहे. मुजफ्फपूरमध्ये रुग्णालय अधिक्षक एसपी सिंह यांनी सांगितले की, यावर्षीच्या जानेवारीपासून या आजारामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल हॉस्पिटलमध्ये 17 मुलांचा मृत्यू एईएसमुळे झाला आहे. सध्या 115 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच या आजारापासून मुलांचा बचाव करण्यासाठी डॉक्टरांची आणखी टीम पटणावरुन मुजफ्फरपूरला पाठविण्यात आली आहे अशी माहिती दिली.
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये दरवर्षी या आजारामुळे मुलांचा मृत्यू होतो. या आजाराचा सामना करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी अमेरिकेपासून जपानपर्यंत अनेक देशांचे दौरे केले मात्र काहीच साध्य झालं नाही. यावर्षीही मुलांचा मृत्यू शंभराच्या आसपास पोहचला आहे. तर आरोग्य विभाग उपचाराऐवजी देवावर विश्वास ठेवा सांगत लवकर पाऊस पडो आणि या आजाराचा प्रकोप थांबावा अशी इच्छा व्यक्त करत आहे. वाढत्या उष्माघाताने मुजफ्फरपूरमधील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. या आजाराचा प्रकोप थांबण्यासाठी सरकारकडून 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मुलांच्या लसीकरणावर खर्च करते तरीही मुलांचे मृत्यू थांबत नाहीत.