नवी दिल्ली/ भोपाळ : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाचे (व्यापमं) घोटाळ्याचे गूढ वाढत असतानाच त्यातील संबंधितांच्या मृत्यूची मालिकाही सुरूच आहे. व्यापमंची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेली अनामिका सिकरवार (२५) हिचा मृतदेह सोमवारी सागर जिल्ह्यातील तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना हटविण्याची आणि निष्पक्ष चौकशीची मागणी लावून धरली असतानाच राज्यपाल रामनरेश यादव यांना पदावरून हटवून चौकशीची मागणी करणारी याचिका विचारात घेण्याला सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. राज्यपालावर ठपका ठेवला जाण्याच्या विरळा घटनेमुळे राज्य सरकारसोबतच केंद्रातील मोदी सरकारचीही अडचण वाढली आहे.यादव यांना हटवून त्यांचा जाबजबाब नोंदविला जावा, अशी विनंती वकिलांच्या एका गटाने केली आहे. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्या. अरुणकुमार मिश्रा, अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने सोमवारी या याचिकेसह अन्य याचिकांवर ९ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे.अनामिका हिने मोरेना जिल्ह्यातील रहिवाशासोबत विवाह केला होता. ती सागर जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण अकादमीत वास्तव्याला होती. तिचा मृतदेह अकादमीलगतच्याच तलावात सापडला. तिने आत्महत्या केल्याचा संशय असल्याचे शहर पोलीस अधीक्षक गौतम सोळंकी यांनी सांगितले. व्यापमं परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली असली तरी तिचे नाव संशयित लाभार्थ्यांमध्ये नव्हते, असा पोलिसांचा दावा आहे. मुख्यमंत्री चौैहान यांनीही या घोटाळ्याशी तिचा संबंध असल्याचा इन्कार केला आहे. ही घटना दुर्दैवी असून, त्याचा व्यापमं घोटाळ्याशी किंवा तपासाशी संबंध नाही. अशा दुर्दैवी घटनांचा व्यापमंशी संबंध जोडणे योग्य नाही, असे ते म्हणाले. जीवाला धोका- चतुर्वेदीव्यापमं घोटाळा उघडकीस आणणारे जागले कार्यकर्ते (व्हिसलब्लोअर) आशिष चतुर्वेदी (२६) यांनी जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचा थेट सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला.
व्यापमं घोटाळ्यातील महिला पोलिसाचा मृत्यू
By admin | Published: July 07, 2015 3:40 AM