उत्तरकाशी/मुंबई : गिर्यारोहणासाठी गेलेल्या व हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच्या डोंगराळ भागात रस्ता चुकलेल्या सर्व गिर्यारोहकांची इंडो-तिबेटियन पोलिसानी सुटका केली आहे. त्यात सहभागी झालेल्या हर्षद आपटे यांचा मृत्यू झाला आहे. एकूण २३ जण तिथे अडकले होते. हर्षद आपटे (वय ३३ वर्षे) हे बदलापूर येथे राहत होते.या गिर्यारोहकांत महाराष्ट्रातील ९ जण होते. त्यापैकी चार बदलापूरचेच होते. शिवाय फरिदाबादचा एक व एक मेक्सिकन दाम्पत्य होते. या सर्र्वासोबत एक मार्गदर्शक, एक ट्रेक लीडर व ८ हमालही होते. गिर्यारोहकांमध्ये चार महिला होत्या. रस्ता चुकल्याचे कळताच, त्यांच्यातील दोन हमालांनी कसेबसे खाली उतरून इंडो-तिबेटियन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, त्यांचा शोध सुरू झाला. मात्र, रस्ता चुकण्याआधीच हर्षद आपटे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ते वरपर्यंत गेले नव्हते. त्यांचे आधीच निधन झाले. ट्रेकर्सची सुटका करताना, त्यांनाही बाहेर आणण्यात आले आहे.उत्तरकाशी व हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागातून त्यांची सुटका करण्यात आली. उत्तराखंडच्या संकारी भागात हे गिर्यारोहक गेले होते. तेथून हिमाचल प्रदेशातील सांगला येथे निघाले असताना, ते हर की डून या ठिकाणीही पोहोचले. तिथून राणीकंदमार्गे चित्कुलला जाताना ते रस्ता चुकल्याने दोन दिवस त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नव्हता. त्यांच्या बचावासाठी इंडो-तिबेटियन पोलिसांनी मोहीम हाती घेतली होती. तिथे जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने गिर्यारोहकांचा शोध घेण्यात खूप अडचणी येत होत्या. हर्षदसोबत बदलापूरचे जयेश लिमये, प्रशांत कापडे, प्रसाद नरसाळ आणि मयुरेश जोशी हे चार ट्रेकर्स होते. त्यांचे ११ जणांचे पथक बेस कॅम्पकडे येत असताना, हर्षदला श्वसनाचा त्रास झाला.>कुटुंबीय झाले रवानाआपला ट्रेक पूर्ण करून हे सारे जण बेस कॅम्पकडे निघाले असताना, हर्षद आपटे यांना श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला. त्यांना खाली आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, त्यांचे वाटेत निधन झाले. त्यांचे कुटुंबीय उत्तराखंडला रवाना झाले आहेत. हर्षद आपटे विवाहित असून, त्यांना पाच वर्षांची एक मुलगीही आहे. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गिर्यारोहण केले आहे, पण या भागात ते पहिल्यांदाच गेले होते, असे सांगण्यात आले. बदलापूर (पूर्व) येथील गांधी चौक भागात त्यांचे घर आहे.
बदलापुरातील तरुणाचा उत्तराखंडमध्ये मृत्यू, महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहकांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 6:31 AM