नवी दिल्ली- रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये (जानेवारी ते सप्टेंबर) रस्ते अपघातातील मृतांचा आकडा ५ हजारांनी घटला आहे. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या रस्ते सुरक्षा समितीला राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीमधून ही आकडेवारी समोर आली आहे. रस्ते अपघातांमधील मृतांची आकडेवारी राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीवरुन समोर आली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीवरून टक्केवारीनुसार पंजाब पहिल्या क्रमांकावर आहे. पंजाबमधील रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांचं प्रमाण 14.4 टक्क्यांनी घटलं आहे. तर त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगालमध्ये रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 13.7 टक्क्यांनी घटलं आहे. अपघातातील मृतांचा घटलेला आकडा लक्षात घेतल्यास महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षातील पहिल्या तीन तिमाहींचा (जानेवारी ते सप्टेंबर) विचार करता, यंदाच्या वर्षात महाराष्ट्रात रस्ते अपघातातील मृतांची संख्या 807 ने कमी झाली आहे. यानंतर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात रस्ते अपघाताताली मृतांची संख्या 775 ने कमी झाली आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीत अपघातांमध्ये मृत पावलेल्यांची संख्या 1 हजार 93 इतकी आहे. गेल्या वर्षी हाच आकडा 1 हजार 212 इतका होता. तर चंदिगढमधील रस्ते अपघातात दगावलेल्यांच्या संख्येत 25.2 टक्क्यांची घट झाल्याचं नोंदविण्यात आलं आहे.
दुसरीकडे बिहारमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचं निदर्शनास आलं आहे. बिहारमध्ये यावर्षी अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा 378 ने वाढला आहे. यानंतर या यादीत ओडिशाचा क्रमांक लागतो. ओडिशात 2016 मधील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये रस्ते अपघातात 3 हजार 306 जणांचा बळी गेला होता. यंदा हा आकडा वाढला असून 3 हजार 495 इतका झाला आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात रस्ते दुर्घटनेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये झालेली घट ही राज्यांकडून केलेल्या योग्य उपाययोजनांचं उदाहरण आहे. अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध होतो, असंही ते पुढे म्हणाले. रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे व्यक्तीच्या होणाऱ्या मृत्यूचा त्याच्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. विविध संघटनांच्या माध्यमातून आम्ही रस्ते अपघात टाळायला जागृकता निर्माण केली, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.