भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे रविवारी पन्ना जिल्ह्यात पूरग्रस्त भागात गेले होते. यावेळी एका ओढ्यातून पाणी वाहत असताना दोन सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचलून घेतले आणि रस्ता पार केला. हेच छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका होत आहे. ही तर सरंजामशाही असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यानंतर राज्याच्या जनसंपर्क विभागाने हे छायाचित्र जारी केले होते. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जनसंपर्क विभागाने आपल्या साईटवरुन हटविले. पण, तोपर्यंत हे छायाचित्र राज्यात चर्चेचा विषय झाले होेते. मध्यप्रदेश काँगे्रसचे अध्यक्ष अरुण यादव म्हणाले की, चौहान यांचे हे छायाचित्र म्हणजे स्वस्तात लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न दिसतो. पण, हा प्रकार त्यांच्यावरच उलटला आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सचिव एस. के. मिश्रा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. तर पुराच्या पाण्यातून कुठल्याही विषारी जीव जंतूपासून संरक्षण करण्यासाठीच त्यांना सुरक्षित पलीकडे नेण्यात आले. दरम्यान, चौहान यांच्यावर टीका करताना यादव यांनी म्हटले आहे की, पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री स्वत:च सुरक्षा रक्षकांसाठी एक समस्या ठरले. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. यातून चौहान यांचे सरंजामशाही विचार दिसून येतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्ते अजय दुबे यांनी या छायाचित्राला ‘मै राजकुमार हंू’ असे शीर्षक दिले आहे. दुबे पुढे म्हणतात की, या छायाचित्रामुळे राजा महाराजांचा काळ आठवला. (वृत्तसंस्था)
चौहानांच्या छायाचित्रावरून वाद
By admin | Published: August 23, 2016 6:15 AM