नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी कर्नाटकातील अनेक राजकीय नेत्यांवर धाडी टाकल्या होत्या. त्यांच्यापैकी काहींनी कर विवरण भरले नव्हते, तर काहींकडे काळा पैसा असल्याचा संशय होता. काँग्रेसचे विधान परिषद सदस्य गोविंद राज यांच्या घरावरील धाडीत अधिकाऱ्यांना एक डायरी मिळाली होती. या डायरीतील कथित संशयास्पद नोंदीवरून आता वाद पेटला आहे. गोविंद राज अत्यंत प्रभावशाली नेते आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची जवळीक असल्याचे मानले जाते. पक्षासाठी निधी गोळा करणारे म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र कर्नाटकपुरते मर्यादित नसून, दिल्लीच्या राजकीय नेत्यांसोबतही त्यांची ऊठबस आहे. ते कर्नाटक आॅलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही डायरी गोविंदराज यांच्या बेडरुममध्ये सापडली. सहारा आणि बिर्ला ग्रुपच्या अधिकाऱ्यांकडे मिळालेल्या डायऱ्यांप्रमाणेच या डायरीतही लोकांची नावे, त्यांचे कार्यालय आणि कंपन्यांचा उल्लेख आहे. विविध कामांसाठी या लोकांना पैसे दिले गेल्याचा संशय आहे. यातील एका रकान्यात ज्यांनी पैसे दिले त्यांची नावे आहेत, तर दुसऱ्या रकान्यात या काँग्रेस नेत्याने हे पैसे ज्यांना दिले त्यांची नावे आहेत. या डायरीत ६०० कोटी दिल्याचा उल्लेख आहे. दुसऱ्या रकान्यात ज्यांना पैसे दिले त्यांची आद्याक्षरे असून, या नोंदी संशयास्पद आहेत. डायरीत ‘स्टील ब्रिज’कडून ६५ कोटी मिळाल्याचा उल्लेख आहे. एक सात कोटींचीही नोंद असून, हे पैसे बंगळुरू महापालिका निवडणुकीत प्रसिद्धीमाध्यमांना दिल्याचे म्हटले आहे.काँग्रेसने डायरीचे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रचलेले कारस्थान असल्याचा आरोप केला. बिर्ला आणि सहारा ग्रुपच्या अधिकाऱ्यांंवरील धाडीत सापडलेल्या डायरीत मोदींचे नाव आल्यामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले असून, त्याची भरपाई करण्यासाठी भाजपने हे कुभांड रचले आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले. काँग्रेसने केंद्रीय मंत्री अनंत कुमार व कर्नाटक भाजपचे प्रमुख येडीयुरप्पा यांचा एक व्हिडिओ समोर आणला. यात दोन्ही नेते सत्तेत राहण्यासाठी पैसे दिल्याचे तसेच कर्नाटक सरकारविरुद्ध डायरी प्रकरणाद्वारे कट रचल्याचे म्हणत असल्याचे दिसते. मोदी सरकारच्या सांगण्यावर तपास यंत्रणा बनावट डायऱ्यांचा उपयोग करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. सरकार कुभांड रचण्यात शक्ती खर्च करतेय, असा आरोपही त्यांनी केला.
कर्नाटकातील नेत्याच्या डायरीवरून वाद
By admin | Published: February 25, 2017 12:21 AM