नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्याआड येत असलेले फेसबुकचे संस्थापक खुद्द मार्क झुकेरबर्ग यांनाच खांदा धरवून बाजूला हटविल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच नवा वाद उफाळला आहे. फेसबुकच्या मुख्यालयात याच कंपनीच्या प्रमुखाला अशा पद्धतीने बाजूला सारताना मोदी शाळकरी मुलांसारखेच वागल्याचे सांगत काँग्रेसने हल्लाबोल चालविला आहे.मोदींनी विदेशात असताना आपल्या पदाच्या प्रतिष्ठेनुसार आचरण करावे. शाळकरी मुलासारखे वागू नये, असा सल्ला काँग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी दिला. रविवारी सिलिकॉन व्हॅलीत मुलाखत सुरू होण्यापूर्वी घडलेल्या या घटनेवर सोशल मीडियामध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी मोदींच्या छायाचित्र प्रेमाची खिल्ली उडविली. फेसबुकच्या सीओओ शेरील सँडबर्ग मोदींना मानचिन्ह(मेमेंटो)भेट देत असताना झुकेरबर्ग हे मध्ये आडवे आल्यामुळे मोदींचा चेहरा झाकला गेला होता. मोदींनी झुकेरबर्ग यांचा खांदा पकडून त्यांना बाजूला सारले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शकील अहमद म्हणाले की, मोदी इव्हेंट मॅनेजमेंट, पॅकेजिंग आणि छायाचित्रे काढून घेण्यासाठी जगभरात ओळखले जातात. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवादी देशाचे पंतप्रधान या नात्याने त्यांनी पदाचा सन्मान करायला हवा. छायाचित्र काढून घेण्यासाठी त्यांनी केलेली कृती देशाच्या प्रतिष्ठेसाठी योग्य नाही. त्यांनी किमान विदेशात तरी या बाबीकडे लक्ष द्यावे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
झुकेरबर्गला बाजूला सारल्याने वाद
By admin | Published: September 29, 2015 11:06 PM