दिल्ली : नीती आयोग के सीईओ अमिताभ कांत यांनी येत्या ४ वर्षाच्या काळात डेबिट व क्रेडिट कार्ड सोबत एटीएम मशीन्ससुद्धा कालबाह्य होतील आणि लोक सर्व वित्तीय व्यवहार आपल्या मोबाईलवरून करण्यास प्राधान्य देतील असे भाकीत वर्तवले आहे. शनिवारी नोएडा येथील एमिटी यूनिवर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली त्यावेळी ते बोलत होते.
विविध विषयावर आपले मत व्यक्त करत कांत यांनी देशाच्या लोकसंख्येवरही भाष्य केले, ते म्हणाले, भारताची लोकसंख्या हि इतिहासातील सर्वात मोठ्या संक्रमण काळातून जात आहे. आपली ७२ टक्के लोकसंख्या ३२ वर्षाची आहे. आपली लोकसंख्या तरुण होत आहे तर या उलट अमेरिका व युरोपची लोकसंख्या वृद्ध होत आहे. आपल्याला सतत नवीनतेच ध्यास असणा-या समाजाची रचना करायची आहे.
कांत पुढे म्हणाले कि, " येत्या ३ ते ४ वर्षात आपण सर्वच जास्तीत जास्त व्यवहार हे मोबाईलवर करण्यास प्राधान्य देऊ. यामुळे क्रेडिट व डेबिट कार्ड आणि एटीएम एक प्रकारे कालबाह्य होतील. सध्या जगात भारत सर्वाधिक बँक खाते, बॉयोमीट्रिक्स आणि मोबाईल असलेला एकमेव देश आहे. यातून खूप क्लिष्टता निर्माण होऊ शकते. यामुळे लोक मोबाईल वरून आर्थिक व्यवहार करण्यास प्राधान्य देतील आणि काही अंशी लोकांनी याची सवयसुद्धा केली आहे. यासोबतच त्यांनी देशाच्या विकास दराबाबत बोलताना म्हटले, भारताचा विकास दर ७.५ टक्क्यांनी वाढत असून हा जगाच्या आर्थिक परीदृश्यात समाधान कारक आहे. परंतु आपले लक्ष ९ ते १० टक्के विकास दर प्राप्त करण्याचे आहे.