Indian Air Force: भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमानाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. साडेसात वर्षांपूर्वी 29 सैनिकांना घेऊन जाणारे हवाई दलाचे एएन-32 विमान अचानक बेपत्ता झाले होते. आता इतक्या वर्षांनंतर त्या विमानाचे अवशेष बंगालच्या उपसागरात साडेतीन किलोमीटर खोलवर सापडले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) ने या विमानाचा शोध लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे विमान 22 जुलै 2016 रोजी एका मोहिमेदरम्यान बंगालच्या उपसागरावरुन जात असताना अचानक बेपत्ता झाले होते. या विमानात हवाई दलाचे 29 सैनिक होते, त्यांचाही तेव्हपासून काहीच पत्ता लागला नाही. या घटनेनंतर विविध विमान आणि जहाजांद्वारे मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहिम राबवण्यात आली, पण कुणाच्याच काही काही लागले नाही.
आता साडेसात वर्षांनंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) ला या विमानाचे अवशेष सापडले आहे. यासाठी संस्थेने विमान बेपत्ता झाले, त्या ठिकाणी समुद्रात ऑटोमॅटिक अंडरवॉटर व्हेईकल (AUV) तैनात केले होते. याच्या मदतीने समुद्रात 3400 मीटर खोलीवर शोध घेण्यात आला. या शोधादरम्यान मिळालेल्या छायाचित्रांमध्ये विमानाचे अवशेष आढळले. हे ठिकाण चेन्नईच्या किनार्यापासून अंदाजे 310 किमी अंतरावर समुद्रात आहे.