नवी दिल्ली - तुमच्या मोबाइल फोनची आधार कार्डसोबत जोडणी करण्यात आली आहे का? जोडणीसाठी तुम्हाला स्टोअरमध्ये जाण्याचा कंटाळा येतोय? तर मग तुमची ही कटकट लवकरच मिटणार आहे. 1 डिसेंबरपासून मोबाइल फोनधारकांना आधार कार्ड आधारित सिम कार्ड पुन्हा पडताळण्यासाठी टेलिकॉम कंपनीच्या स्टोअरपर्यंत जाण्याची गरज नाही. कारण आता ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्याही करू शकणार आहात.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)नं टेलिकॉम कंपन्यांकडून सादर करण्यात आलेले मॉडेल स्वीकारले आहे. यामध्ये आधारद्वारे जारी करण्यात आलेल्या सिम कार्डची पुन्हा पडताळणी करण्यासाठी ओटीपीसारख्या पर्यांयांचा समावेश करण्यात आला आहे. इकनॉमिक टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, UIDAIचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले आहे की, ''याद्वारे लोकांना टेलिकॉम स्टोअरमध्ये न जाता घरबसल्या आपला मोबाइल फोन आधार कार्डसोबत जोडणी करण्यासाठी व पडताळणीसाठी मदत मिळणार आहे''.
टेलिकॉम डिपार्टमेंटनं गेल्या महिन्यात कंपन्यांना 3 पद्धती म्हणजे एसएमएसद्वारे ओटीपी, इंटरेक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) आणि टेलिकॉम कंपन्यांना मोबाइल अॅप्सद्वारे मोबाइल फोन क्रमांक पुन्हा पडताळणीसाठी परवानगी दिली होती. या विभागानं आयरिस आधारित बायोमेट्रिक डिव्हाईसच्या माध्यमातून मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आणि ओटीपी किंवा अन्य पर्यायांचा उपयोग न करणा-या ग्राहकांच्या घरी जाऊन जोडणी प्रक्रिया पूर्ण करण्याचीही परवानगी दिली होती.
पांडे यांनी सांगितले की, ग्राहकानं मोबाइल फोन कंपनीच्या पोर्टलवर भेट देऊन आपला मोबाइल क्रमांक आणि आधार क्रमांक दिल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमाकांवर ओटीपी येईल. दुसरा पर्याय म्हणजे ऑपरेटर IVRS क्रमांक जारी करतील आणि त्यावर ग्राहकांना आपला आधार व मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर ओटीपी क्रमांकाचा मेसेज येईल आणि हा क्रमांक दिल्यानंतर पडताळणी केली जाईल.
या पर्यायांचा स्वीकार केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड व मोबाइल सिम कार्ड जोडणी करण्यासाठी मोबाइल कंपनीच्या स्टोअरमध्ये जाण्याची काहीही आवश्यकता भासणार नाही, कारण ही प्रक्रिया घर बसल्याच आता करता येणार आहे.