नवी दिल्ली - खरंतर 31 डिसेंबर इयर एण्डचा दिवस असल्याने सर्वचजण पार्टी मूडमध्ये असतात. या दिवशी काम टाळण्याकडे बहुतांश जणांचा कल असतो. यंदा तर 31 डिसेंबरला रविवार आल्याने कामाच प्रश्नच नाही. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मात्र याला अपवाद आहेत. गुजरातचा गड सर केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आता कर्नाटकवर लक्ष केंद्रीत केले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी येत्या 31 डिसेंबरला अमित शहा कर्नाटकमधील आमदार, खासदारांची बैठक घेणार आहेत.
गुजरात-हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक निकालानंतर सरकार स्थापन झाल्यामुळे राजकीय आघाडीवर तशी शांतता आहे. पण अमित शहा मात्र या सुट्टयांच्यादिवसांमध्येही कामामध्ये व्यस्त आहेत. सध्या नाताळच्या सुट्टया असल्याने काँग्रेस मुख्यालय बंद आहे पण अमित शहा यांनी 25 डिसेंबरला भाजपा कार्यालयात पक्षाच्या सरचिटणीसांची बैठक घेतली आणि काही महत्वाचे निर्णय घेतले. पुढच्यावर्षी एप्रिलपर्यंत देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये पक्ष कार्यालय नाहीय तिथे कार्यालय सुरु करण्याचा लक्ष्य ठरवण्यात आले आहे.
अमित शहा भाजपा अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पक्ष विस्तार आणि संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात बिहार, दिल्लीचा अपवाद वगळता भाजपाने पराभव पाहिलेला नाही. भाजपा एकापाठोपाठ एक राज्य काबीज करत चालला आहे. सध्या देशातील 19 राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे.
यंदाच्यावर्षातील उत्तर प्रदेश आणि गुजरातची निवडणूक शहा यांच्यासाठी कठिण परिक्षा होती. उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठया राज्यात पूर्ण बहुमताने त्यांनी भाजपाचे सरकार आणले तर 22 वर्षानंतरही गुजरातमध्ये प्रस्थापित सरकारविरोधात लाट असतानाही सत्ता कायम टिकवण्यात त्यांना यश आले. ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये पक्ष विस्तारावर त्यांनी विशेष भर दिलायं. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागतोय पण भाजपा इथे पूर्ण ताकदीने निवडणूक लढवतोय त्याचे श्रेय शहा यांना जाते.