ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासदर्भातील केंद्र सरकारच्या ताब्यात असलेले दस्तावेज जनतेसाठी खुले करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी जाहीर केले आहे. सुभाषबाबुंच्या ३५ वंशजांनी आज मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमच्यामध्ये अत्यंत चांगल्याप्रकारे चर्चा झाल्याचे मोदींनी ट्विट केले आहे.
पश्चिम बंगाल सरकारने नेताजींच्या संदर्भातले दस्तावेज गेल्या महिन्यात खुले केले. नेताजींच्या मृत्यूबाबत गूढ असून या दस्तावेजांच्या आधारे त्यांच्या अंतिम दिनासंदर्भातील सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे. राज्याप्रमाणेचे केंद्रानेही सरकारी दस्तावेज खुले करावेत आणि नेताजींच्या गूढ शेवटावर झोत टाकावा अशी अपेक्षा व्यक्त होत होती. नेताजी सुभाष चंद्र बोसांच्या जन्मदिनापासून म्हणजे २३ जानेवारी २०१६ पासून दस्तावेज खुली करण्याची प्रक्रिया सुरू होईल असे मोदी यांनी जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे, जगभरातील ज्या ज्या देशांकडे नेताजींसदर्भात सरकारी दस्तावेज आहेत त्यांनीही ते खुले करावेत अशी मागणी आपण करू आणि सगळ्यात आधी रशियाला डिसेंबरमध्ये तशी विनंती करू असेही मोदींनी सांगितले आहे.
पश्चिम बंगाल व केंद्र सरकारच्या दफ्तरी असलेल्या या कागदपत्रांचा तज्ज्ञ अभ्यास करतील आणि नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलतील अशी अपेक्षा आहे.