नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर आज दूर झाला आहे. पुण्यातील लोकसभेच्या बहुचर्चित जागेवर भाजपाने ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सोलापूरमधून वर्तवण्यात येत असलेल्या शक्यतेनुसार जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज भाजपानेमहाराष्ट्रामधील अन्य चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणाही केली आहे.
मध्यवर्ती निवडणूक समितीच्या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 36 उमेदवारांचा समावेश असलेली आपली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि ओदिशामधील उमेदवारांचा समावेश आहे. पैकी महाराष्ट्रामधील सहा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जळगाव येथून स्मिता उदय वाघ, नांदेड येथून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी येथून डॉ. भारती पवार, पुण्यामधून गिरीश बापट, बारामती येथून कांचन राहुल कूल आणि सोलापूर येथून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ईशान्य मुंबईतील उमेदवार भाजपाने अद्यापही घोषित केलेला नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम वाढला आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आल्याने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट झाला आहे. पुणे शहर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता होती. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या दोन यादीत विद्यमान खासदार शिरोळे यांचे नाव नसल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. दरम्यान गिरीश बापट यांनी गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटी सुरू केल्या होत्या. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे बंड थंड झाले होते. कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही असे त्यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा जाहीर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या तिसऱ्या यादीत बापट यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून अद्याप काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. गिरीश बापट कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. राज्य मंत्रिमंडळात संसदेचे कामकाज, अन्न आणि नागरी पुरवठा या विभागाचे मंत्रीपद ते सांभाळत आहेत.
महाराष्ट्रातील भाजपा उमेदवारांची यादी
दरम्यान, भाजपाने आज जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांच्या नावाचाही समावेश असून, पात्रा यांना ओदिशामधील पुरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपाचे ओदिशामधील प्रदेशाध्यक्ष बसंतकुमार पांडा यांना कालाहांडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.