नवी दिल्ली - अल्पसंख्याक हिंदू आणि शीख समुदायात भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने काश्मीर खोऱ्यात (Jammu Kashmir) पाकिस्तानने (Pakistan) भडकवलेल्या हिंसाचाराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. याच महिन्यात पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) स्थानिक गटाने श्रीनगरमध्ये (Srinagar) पाच निर्दोष लोकांची हत्या केली आहे.
गुप्तचर संस्था आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चार दहशतवादविरोधी आणि गुप्तचर तुकड्या श्रीनगरमध्ये तैनात आहेत. पिन-पॉइंट अॅक्शनद्वारे या दहशतवादी मोड्यूल्सचा नायनाट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) श्रीनगरमध्ये सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. याचबरोबर सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबविण्यास सांगण्यात आले आहे.
काश्मिरी पंडित फार्मासिस्ट माखनलाल बिंदू, शाळेच्या मुख्याध्यापक सुपिंदर कौर, शाळेचे शिक्षक दीपक चंद आणि बिहारचा एक फेरीवाला वीरेंद्र पासवान यांच्या हत्येनंतर, सुरक्षा दलाचे जवान नवा कुठलाही धोका टाळण्यासाठी श्रीनगर शहरात तपास करत आहेत. यासंदर्भात केंद्रानेही स्पष्ट निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 7 ऑक्टोबरला सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर, सर्वप्रथम गुन्हेगारांना संपवणे आणि नंतर त्यांना स्पॉन्सर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे केंद्राने ठरविले आहे.