नवी दिल्ली : भारताबरोबरचे राजनैतिक संबंध निम्नस्तरीय पातळीवर आणून पाकिस्तान द्विपक्षीय संबंध खूपच वाईट झाल्याचे अनाठायी चित्र जगापुढे मांडू पाहत आहे, अशी टीका भारताने गुरुवारी केली आहे.भारताच्या परराष्ट्र खात्याने म्हटले की, जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. या निर्णयाचे निमित्त करून पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडण्याचे तसेच इतर निर्णय जाहीर केले तो खेदजनक प्रकार आहे.भारताने जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी उचललेल्या पावलाला पाकिस्तानने नकारात्मक वळण द्यावे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीला पाठबळ देण्यासाठी पाकिस्तान अशा भूमिका नेहमीच घेत आला आहे. भारताची राज्यघटना सार्वभौम असून त्याअंतर्गतच आम्ही काश्मीरबाबत निर्णय घेतला आहे. त्याविरोधात पाकिस्तानने चालविलेला कांगावा कधीही यशस्वी होणार नाही. जम्मू-काश्मीरबाबत भारताने निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी त्या देशातील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठवले. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये विकासाच्या आणखी संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकार व संसदेने नुकतेच काही निर्णय घेतले आहेत. राज्यघटनेतील काही तात्पुरत्या तरतुदींमुळे त्या राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येत होता. तर, काश्मीरमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस हे भारत व पाकिस्तानच्या सातत्याने संपर्कात आहेत, असे त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले.काश्मीर निर्णय भारताने मागे घेतल्यास पाकिस्तानही करणार फेरविचारइस्लामाबाद : काश्मीरबाबत नुकताच घेतलेला निर्णय मागे घेण्याची भारताची तयारी असल्यास पाकिस्तानही आपल्या निर्णयांचा फेरविचार करील, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी गुरुवारी म्हटले आहे.काश्मीरबाबत भारताने निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला. भारताबरोबरचे व्यापारी संबंध संपविण्याचा तसेच राजनैतिक संबंध निम्नस्तरावर आणण्याचा निर्णय पाकिस्तानने बुधवारी घेतला. त्याचबरोबर भारताच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांना परत पाठविण्यात आले.समझोता एक्स्प्रेस सेवा पाकिस्तानने बंद केली. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आता भारताला काश्मीर निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितले आहे. काश्मीर हा वादग्रस्त प्रदेश असल्याचे सुरक्षा परिषदेच्या ठरावांत नमूद केले असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मुहम्मद फैसल यांनी म्हटले आहे. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा भारताचा एकतर्फी निर्णय आम्हाला मान्य नाही, असेही ते म्हणाले.व्यापार रद्द केल्याचा फटका पाकिस्तानला जास्त बसणारनवी दिल्ली : भारतासोबतचा द्विपक्षीय व्यापार रद्द केल्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला तरी त्याचा अधिक फटका पाकला बसेल, असे जाणकारांना वाटते. पाकिस्तान भारताकडून कांदे, टोमॅटो आणि रसायने यासारख्या काही अत्यावश्यक वस्तूंची आयात करतो.व्यापार बंद केल्यानंतर ही आयात थांबून पाकिस्तानची कोंडी होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम भारताने रद्द केल्यामुळे पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध कमी केले असून, द्विपक्षीय व्यापार निलंबित केला आहे.‘फेडरेशन आॅफ इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशन्स’चे महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले की, भारत पाकिस्तानवर फारसा अवलंबून नाही. पाकिस्तान मात्र भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार निलंबित झाल्यास पाकिस्तानला अधिक फटका बसेल.
'व्यापार तोडण्याचा निर्णय खेदजनक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 2:21 AM