संतोष ठाकूर नवी दिल्ली : मुंबईत होणा-या देशातील पहिल्या एलिवेटेड (उंचीवरुन) रेल्वे लाइनचे रंग रुप कसे असेल? याचा निर्णय नव्या वर्षात होणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मार्चपर्यंत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईत चर्चगेट - विरार आणि सीएसटी - पनवेल दरम्यान एलिवेटेड रेल्वे लाइन करण्याची घोषणा रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली होती. मुंबईची लाइफ लाइन समजल्या जाणाºया रेल्वे लाइनवरील प्रवाशांचा वाढता ताण कमी करणे आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुविधाजनक करणे, हा यामागचा उद्देश आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आगामी तीन महिन्यात आम्ही या प्रकरणी निर्णयाप्रत येऊ. या विषयावर सुरु असलेला अभ्यास फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याच्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, मुंबईतील लाइन्सवर निश्चितपणे ताण वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रस्ताव दिलासा देणारा आहे. पण, आमचा निर्णय याबाबतच्या अहवालावरुनच ठरणार आहे. जर अहवालात या लाइन्स बनविण्याबाबत सकारात्मक मत आले तर, सद्याच्या लाइन्सच्या अगदी वर न करता त्या लाइनसोबत बनविण्यात येतील. अर्थात, यासाठी प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग सद्याच्या रेल्वे स्टेशनमधूनच असेल. यासाठी शिड्या आणि लिफ्ट असेल. मुंबईतील लाइफ लाइन दुरुस्तीसाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी निर्देश दिले आहेत आणि नियमित समीक्षा बैठक घेत आहेत.एका अधिकाºयाने सांगितले की, गत रेल्वे बजेटमध्ये या लाइन्सचा उल्लेख होता. या लाइन मेट्रो नेटवर्कशी लिंक करण्यासोबतच मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि प्रस्तावित नवी मुंबई एअरपोर्टशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे. हा रेल्वेमार्ग जमीनीपासून किती उंचीवर असेल किंवा काही ठिकाणी जमीनीच्या खालीही असेल याबाबतची माहिती अभ्यास अहवालातून समोर येईल. त्याआधारे रेल्वे पुढचे पाऊल टाकणार आहे.>एका अधिकाºयाने सांगितले की, एक विचार असाही आहे की, दिल्ली एअरपोर्ट लाइनप्रमाणेच एलिवेटेड रोडवर विशेष रेल्वे एअरपोर्ट कनेक्टिव्हिटीसाठी चालविली जावी. यामुळे उत्पन्न काही प्रमाणात वाढविता येईल. पश्चिम आणि सेंट्रल रेल्वेचा असाही सल्ला आहे की, या प्रस्तावित एलिवेटेड लाइनवर एसी रेल्वेही चालविली जावी. याबाबत प्रारंभिक स्तरावर रेल्वे मंत्रालय सहमत आहे.
एलिव्हेटेड रेल्वेबाबत निर्णय मार्चमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 6:17 AM