नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज गुरुवारी होणार असून निवडणूक आयोगाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. सुरक्षा बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पाच राज्यांमध्ये झालेल्या या निवडणुका राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. ममता बॅनर्जी, जयललिता, तरुण गोगोई, एम. करुणानिधी, ओमेन चंडी, व्ही.एस. अच्युतानंदन, बुद्धदेव भट्टाचार्य, सर्वानंद सोनोवाल, एन. रंगासामी आदी दिग्गज नेत्यांच्या भवितव्याचा फैसला या निकालाने होणार आहे.३ वाजेपर्यत सर्व निकालमतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होऊन दुपारी ३ वाजेपर्यत पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिली. मतमोजणी सुरू झाल्यावर तासाभरातच कल येणे सुरू होतील आणि १२ वाजेपर्यंत निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे स्पष्ट होईल. या निवडणुकीद्वारे ईशान्येकडील आसाममध्ये आपले सरकार स्थापन करण्याच्या भाजपाच्या दावेदारीवरही स्थिती स्पष्ट होईल. तामिळनाडूतही जयललिता यांच्या नेतृत्वातील अण्णाद्रमुकची सत्ता कायम राखण्यासाठीची कवायत आणि करुणानिधी यांच्या नेतृत्वातील द्रमुककडून मिळालेले आव्हान यात कोण वरचढ ठरणार हे कळेल. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफ आणि डाव्यांच्या एलडीएफमध्ये चुरस आहे. आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांसाठी ८,३०० उमेदवार रिंगणात होते. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान पार पडले. राज्यात विधानसभेच्या २९४ जागा होत्या. तामिळनाडूत २३२ जागांसाठी ३७०० च्या वर उमेदवारांनी आपले राजकीय भविष्य अजमावले आहे. >पावसाचे सावटमतमोजणी होणाऱ्या पाचही राज्यांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मतमोजणीच्या कामातील आयोगाच्या कर्मचाऱ्यांची बरीच अडचण होणार आहे. विविध वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीनंतर जाहीर केलेल्या सर्वेक्षणात आसाम, तामिळनाडू आणि केरळमध्ये परिवर्तनाची शक्यता वर्तविली आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र पुन्हा ममता बॅनर्जी यांचा पक्षच पुन्हा सत्तेवर येईल, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.
पाच राज्यांचा आज फैसला
By admin | Published: May 19, 2016 5:42 AM