नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉलची किंमत 25 टक्क्यांनी वाढविली असून याचा फायदा साखर कारखान्यांना होणार आहे. मात्र, यामुळे पेट्रोलचे दर काही पैशांमध्ये वाढण्याची शक्यता असून साखरेचे उत्पादनही कमी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सध्या 47.49 प्रती लीटर असलेले इथेनॉल 52.43 रुपयांना सरकार विकत घेणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज इथेनॉलची किंमत 25 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या साखर उत्पादनासाठी लागू होणार आहे. इथेनॉलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने साखर कारखान्यांना फायदा होणार आहे. जादाचे इथेनॉल उत्पादन घेण्यासाठी कारखाने साखरेचे उत्पादन कमी करण्याची शक्यता आहे.
सध्या पेट्रोल कंपन्या 10 टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळतात. या दरवाढीमुळे महागड्या पेट्रोलच्या काळात आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. तसेच दरवर्षी उत्पादित होणाऱ्या साखरेपेक्षा यंदा 0.7 ते 0.8 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. साखर कारखाने गुळासाठीच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करतात.
देशात दरवर्षी 35.5 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन घेतले जाते. मात्र, काही तज्ज्ञांनी अशी शक्यता वर्तविली आहे की, भविष्यात इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी साखरेचे उत्पादन कमी केले जाऊ शकते.