कोची : कमावत्या व अविवाहित हिंदुधर्मीय मुलीला स्वत:च्या लग्नाच्या खर्चासाठी आपल्या वडिलांकडे पैसे मागण्याचा अधिकार आहे. जरी ही मुलगी व तिची आई ही दोघेही कमावते असले तरी ती गोष्ट मुलीच्या या हक्कामध्ये अडथळा ठरु शकत नाही असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. अगदी अनौरस संततीलाही हा हक्क आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे.अंबिका अरविंदक्षन यांनी केलेल्या अपीलावर केरळ उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. केरळच्या पलक्कड भागातील अकतेतरा येथे राहाणारे के. अरविंदक्षन या पित्याकडून त्यांची मुलगी अंबिका ही स्वत:च्या लग्नाच्या खर्चासाठी पैसे मागू शकत नाही असा निकाल कुटुंब न्यायालयाने दिला होता. या निकालाला अंबिकाने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.न्यायालयाने म्हटले आहे की, रोजचा दैनंदिन खर्च भागवून याचिकाकर्ती व तिची आई किती पैशांची बचत करू शकते, याची कल्पना करु शकतो. याचिकाकर्ती मुलगी किंवा तिची आई या दोघी कमावत्या आहेत किंवा त्यांच्याकडे उत्पन्नाचे अजून काही स्रोत आहेत याच्यावर मुलीच्या वडिलांनी लक्ष ठेवण्याचे कारण नाही. एखाद्या प्रसंगात आई कमावती असेल व ती अविवाहित मुलीचे पालनपोषण करत असेल तर त्या मुलीला आपले शिक्षण व लग्नाच्या खर्चासाठी वडिलांकडे पैसे मागण्याचा अधिकार आहे असेही या निकालपत्रात म्हटले. (वृत्तसंस्था)जगण्यासाठी अनेक गोष्टी आवश्यकजरी मुलगी किंवा तिच्या आईला भाड्याच्या रूपाने १२ हजार रुपये उत्पन्न मिळत असले तरी त्यामुळे मुलीचा हक्क डावलता येणार नाही. माणूस हा केवळ पोटाला अन्न मिळते म्हणून जगतो असे नाही. जगण्यासाठी आणखी अनेक गोष्टींची आवश्यकता असते, असे नमुद करून केरळ उच्च न्यायालयाने करुणाकरन नायर विरुद्ध सुशीला अम्मा या खटल्यामध्ये १९८७ साली जो निकाल याच न्यायालयाने दिला होता त्याचाही संदर्भ दिला.
कमावत्या मुलीला लग्नाचा खर्च मागण्याचा हक्क, केरळ हायकोर्टाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 11:36 PM