शीलेश शर्मा
नवी दिल्ली : गाजीपूर सीमेवर बसलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या लंगरांत नांदेड येथील गुरुद्वारा लंगर साहिब श्री हज़ूर साहिब लंगरची सर्वात जास्त चर्चा आहे.
येथे २५ पेक्षा जास्त लंगर शेतकऱ्यांच्या सेवेत असून नांदेड़चे लंगर सर्वात मोठे आहे. एक डिसेंबरपासून सुरू झालेल्या या लंगरमध्ये रोज हज़ारो आंदोलनकारी शेतकऱ्यांसाठी सकाळच्या चहापासून सकाळ व सायंकाळचे जेवण, दुपारचा चहा, नाश्ता तयार होतोय. या लंगरमध्ये चहा, भात, पोळ्या, वरण, अनेक प्रकारच्या भाज्या, गाज़राचा हलवा, मेक्रोनी आणि इतर खाद्यपदार्थ दिले जातात. गुरुद्वारा लंगर साहिब श्री हज़ूर साहिब लंगर चालवण्याची जबाबदारी त्याच्या पिलिभीत शाखेकडे सोपवली गेली आहे. ते जत्थेदार मोहन सिंग यांच्या देखरेखीत सुरू आहे. जत्थेदार मोहन सिंग यांना खूप उत्साह आहे. ते म्हणतात, “बाबा नरेंद्र सिंग आणि बाबा बलविंदर सिंग यांच्या आशीर्वादाने हा लंगर शेतकरी जोपर्यंत येथे बसून असतील तोपर्यंत चालेल. सरकारने लाठीमार केला, गोळ्या झाडल्या किंवा बाँबही टाकले तरी आम्ही येथून जाणार नाही.”
आमची ५५० वर्षांची परंपरा जत्थेदार मोहन सिंग म्हणाले, ’ही आमची ५५० वर्षांची परंपरा आहे की, शेतकरी दुसऱ्यांना खाऊ घालून स्वत: खातो. येथील स्थानिक सेवादार जेवण बनवण्याचे काम करीत आहेत. धनधान्य व इतर जिन्नसांनी भांडार भरलेले आहेत. आम्ही वर्षानुवर्षे आंदोलनकर्त्यांना खाऊ घालत राहू. जोपर्यंत तिन्ही काळे कृषी कायदे सरकार रद्द करत नाही, तोपर्यंत शेतकरी ना घरी जाईल ना लंगर बंद होईल.”