मुंबई, दि. 24 - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झालेली राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरील दारुची दुकाने पुन्हा उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये हे बार पुन्हा एकदा गजबजलेले दिसू शकतात. पुन्हा एकदा चिअर्स म्हणत लोक दारुच्या दुकानात बसून गप्पा मारताना दिसतील. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय शहरांमध्ये तसंच महापालिकेच्या अख्त्यारित येणा-या शहरांना लागू नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असणारी दारुची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला होता. यानंतर बारमालकांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला होता. मात्र आता न्यायालयाने आपल्या निर्णयात दुरुस्ती करत हा निर्णय फक्त दोन शहरांना जोडणा-या महामार्गांसाठी लागू असल्याचं सांगितलं आहे. तसंच हा आदेश महापालिका क्षेत्रातून जाणा-या रस्त्यांना लागू नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील म्हणजेच शहरांतील रस्त्यांवर असलेली दारू दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी पुढील आठवड्यात परवाना देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती दिली आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर शहरामध्ये हायवेला लागून असणारे सर्व बार सुरु होतील असं उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे.
सरन्यायाधीश जे. एस. केहर, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठासोर ही सुनावणी झाली. महामार्गावर होणारे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ रोजी केंद्र आणि राज्य सरकारांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या ५०० मीटर परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिला होता.
हायवेवरील दारूबंदीमुळे ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये 40 टक्के घटहायवेवरील दारूबंदीच्या या निर्णयानंतर दारू पिऊन गाडी चालविण्याने होणाऱ्या अपघातांच्या संख्येत घट झाल्याची माहिती समोर आली होती. 1 एप्रिल ते 30 जूनच्या दरम्यान दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं होतं. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. यावर्षीच्या एप्रिल ते जून या कालावधीत दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्यांची संख्या 40 टक्क्याने घटल्यामुळे अपघाती मृत्यू तसंच जखमींचा आकडासुद्धा 11 ते 14 टक्क्यांनी घटला होता. राज्य पोलिसांनी जमा केलेल्या माहितीनुसार हायवेवर होणाऱ्या किरकोळ अपघातांची संख्याही 21 टक्क्यांनी घटली होती.