हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री राव यांनी त्यानंतर राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांची भेट घेऊ न विधानसभा बरखास्तीची शिफारस केली. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही त्यांना सादर केला असून, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राव यांनाच काम पाहण्यास राज्यपालांनी सांगितले आहे.राव यांच्या या निर्णयामुळे राज्य विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका यावर्षी होतील. त्या विधानसभेची मुदत मे २0१९ पर्यंत होती. त्यामुळे लोकसभांबरोबरच विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित होते.तेलंगणाची स्थापना २0१४ मध्येच झाली. नव्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या राव यांनी वेगळ्या तेलंगणासाठी मोठे आंदोलन केले होते. गेल्या निवडणुकांत त्यांच्या तेलंगणा राष्ट्रीय समितीला ११९ पैकी ६१ जागांवरच विजय मिळाला होता.मात्र तेलगू देसम, काँग्रेस, बसपा आदी पक्षांतील आमदार नंतर फुटले आणि आजच्या घडीला राव यांच्यामागे ९0 आमदार आहेत.तेलगू देसमने भाजपाशी संबंध तोडल्यामुळे आता तेलंगणात तो पक्ष काँग्रेसशी आघाडी करतो का, अशी चर्चा आहे. काँग्रेस व तेलगू देसम एकत्र आल्यास ते तेलंगणासमितीपुढे मोठे आव्हान उभे करू शकतील. मात्र आंध्रात काँग्रेसहा तेलगू देसमचा प्रमुख विरोधक आहे. त्यामुळे आपल्या विरोधकाशी तेलगू देसम आघाडी करेल का, हाही प्रश्न आहे. तेलंगणात भाजपा, वायएसआर काँग्रेस यांची ताकद खूपच कमी आहे. (वृत्तसंस्था)हे का केले?अलीकडेच गुजरात व कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला चांगले यश मिळाले. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाल्यास तेलंगणातही काँग्रेसला बळ मिळू शकेल, या अंदाजातूनच पुढील वर्षीपर्यंत न थांबण्याचा निर्णय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घेतल्याचे बोलले जात आहे.
तेलंगणात मुदतपूर्व विधानसभा निवडणुका या वर्षीच होणार, राव सरकारने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 1:33 AM