जम्मू : सुंजवान लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. सकाळी सभागृह सुरू होताच सर्व पक्षांचे आमदार सुंजवानच्या लष्करी तळावरील हल्ल्याच्या विरुद्ध एक झाले. त्यांनी हल्ल्याचा जोरदार निषेध केला आणि पाकविरोधी घोषणा दिल्या.आ. रवींद्र रैना यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सदस्य सभागृहात उभे राहिले. त्यांनी पाकविरोधी घोषणाबाजी केली. नॅशनल कॉन्फरन्सचे अली मोहंमद सगर, सीपीआयचे एम.वाय. तारिगामी आणि काँग्रेस सदस्य उस्मान माजीद यांनी हल्ल्याचा निषेध केला.आमदारांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता यांनी लष्करी तळावरील हल्ल्यात बांग्लादेशी तसेच रोहिंग्ये सहभागी असू शकतात, असे विधान केले. त्यामुळे सभागृहात झालेल्या प्रचंड गोंधळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.विरोधी पक्ष सदस्यांनी सर्व वादग्रस्त वक्तव्ये कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकण्याची मागणी केली. ती अध्यक्षांनी मान्य करून हल्ल्यासंदर्भात काही सदस्यांनी केलेली वक्तव्ये कामकाज नोंदीतून काढून टाकण्याचे आदेश दिले.अखेर शनिवारी जम्मूमध्ये लष्करी तळावर अतिरेकी केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात कोणीही वादग्रस्त वक्तव्ये करू नये, असे सभागृहात एकमुखाने ठरविण्यात आले. वादग्रस्त वक्तव्ये सार्वजनिक केली जाऊ नये, यावरही सभागृहाचे एकमत झाले.आमदारच म्हणाला पाक जिंदाबादभाजप सदस्यांनी पाकविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे चिडलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे मोहंमद अकबर लोण यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात लोण यांच्याविरुद्ध संतप्त वातावरण निर्माण झाले होते. नंतर लोण यांनी पत्रकारांना सांगितले की, भाजप मुस्लिमांचा द्वेष करतो. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते जुनैद अजीम मट्टू म्हणाले की, लोणे यांच्या वर्तनाशी पक्ष सहमत नाही. त्यांच्या घोषणा पक्षाला अमान्य आहेत आणि पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही तसे स्पष्ट केले आहे, असे सांगितले.
जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तानविरोधी घोषणा, सर्वांनी केला एकमुखी निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:45 AM