ग्वाल्हेर : मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारने जर जाहीरनाम्यातील आश्वासने पाळली नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठी मला रस्त्यावर उतरावे लागेल, असे काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केले. तथापि, यासाठी काही काळ सबुरी ठेवावी लागेल. कारण, मध्यप्रदेशात पक्षाचे सरकार स्थापन होऊन एक वर्षच झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
ग्वाल्हेर रेल्वेस्थानकावर रविवारी रात्री मीडियाशी त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले की, मी जनतेचा सेवक आहे. जनतेच्या प्रश्नावर लढणे माझा धर्म आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यातही ज्योतिरादित्य यांनी असेच वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले होते की, जर ज्योतिरादित्य शिंदे रस्त्यावर उतरू इच्छितात तर, उतरावे. त्यानंतर काही मंत्र्यांनी म्हटले होते की, आश्वासने पाच वर्षांसाठी आहेत आणि सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले आहे.