नवी दिल्ली : ५०० कोटी किंवा त्याहून अधिकची कर्जे घेऊन ती थकविणाऱ्यांची यादी सादर करणाऱ्या रिझर्व्ह बँकेने ती यादी जाहीर करण्यास मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात जोरदार आक्षेप घेतला. मात्र यादीतील व्यक्तिगत नावे प्रसिद्ध करणे तूर्तास बाजूला ठेवले तरी त्या यादीतील थकित कर्जांच्या रकमा खूप मोठ्या असल्याने ते आकडे तरी तुम्हाला जाहीर करावे लागतील, असे न्यायालयाने रिझर्व्ह बँकेससुनावले.रिझर्व्ह बँकेने गोपनीयतेचा आग्रह लावून धरल्यावर सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठाने बँकेच्या वकिलास सांगितले, एकीकडे काही धनधांडगे त्यांची औद्योगिक साम्राज्ये चालविण्यासाठी हजारो कोटी रुपयांची कर्जे घेतात. नंतर ते दिवाळखोरी जाहीर करतात आणि पुन्हा इतरांकडून नवी कर्जे घेतात. दुसरीकडे काही हजार रुपयांचे थकलेले कर्ज फेडण्याच्या विवंचनेत असलेले शेतकरी नाईलाजाने जमिनी विकतात व काही जणांना तर आत्महत्या करणे भाग पडते. याआधी न्यायालयाने रिझर्व्ह बँकेस ५०० कोटी किंवा त्याहून अधिकच्या व्यक्तिगत तसेच कंपन्यांच्या थकित कर्जांची माहिती देण्यास सांगितले होते. बँकेने थकित कर्जांचा तपशील सादर केला. मात्र सादर केलेली माहिती जाहीर करण्यास विरोध दर्शविला.
‘बड्यांची थकबाकी जाहीर करा’
By admin | Published: April 13, 2016 1:59 AM