पानीपत : जात विचारल्यावर इंडियन लिहिणारे, नास्तिक असल्याचे सांगणारे बरेच आहेत. मात्र, त्यांना अधिकृत मान्यता नाही. हरियाणा सरकारने देशातील पहिल्यांदाच एका युवकाला नास्तिक घोषित केले आहे. एवढेच नाही तर त्याची कोणतीही जात नाही, कोणताही धर्म आणि देव नसल्याचे प्रमाणपत्रच जारी केले आहे. तसेच यावर सिरियल नंबरही देण्यात आला असून यासाठी या युवकाला दोन वर्ष कायदेशीर लढा द्यावा लागला आहे.
हरियाणाच्या टोहाना येथे राहणारा हा युवक यापुढे रवी नास्तिक म्हणून ओळखला जाणार आहे. रवीने नावात बदल करण्यासाठी 2017 मध्ये फतेहाबाद न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला होता. त्याला यंदाच्या जानेवारीमध्ये नावासोबत नास्तिक लिहिण्याची अनुमती देण्यात आली. आता उप जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालयाने रवी नास्तिकला 'नो कास्ट, नो रिलीजन आणि नो गॉड' प्रमाणपत्र दिले आहे.
रवी याचे वकील अमित कुमार सैनी यांनी सांगितले, की 'नो कास्ट, नो रिलीजन आणि नो गॉड' प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. मात्र त्यांनी असे प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले. यामुळे उप जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज देण्यात आला. त्यांनी सर्व कागदपत्रे तपासून तो गुन्हेगार तर नाही याचीही चौकशी केली गेली. तसेच अन्य देशांशी काही संबंध आहेत का याचीही चौकशी केली गेली. तसेच रवी हा या प्रमाणपत्राचा वापर अन्य कोणत्या कारणांसाठी करणार नाही, याबाबतही खात्री करण्यात आली. एवढ्या चौकशीनंतर त्यांनी उप तहसीलदारांना आदेश देत 29 एप्रिलला नास्तिक असल्याचे प्रमाणपत्र दिले.
महत्वाचे म्हणजे रवीचे वडील फर्नीचरचे काम करतात. रवीला त्याची ओळख एखाद्या विशिष्ट जाती, धर्माने व्हावी असे वाटत नव्हते. यामुळे हे प्रमाणपत्र बनविले आहे. तिकडे उप जिल्हाधिकारी धीरेंद्र खडगटा यांनी सांगितले की, या आधी असे प्रकरण आपण पाहिले नाही. स्वयंघोषितच्या आधारे त्याला हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.