कर्नाटक विधानसभेतील 15 मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटक राज्याचे मुख्य निर्वाचन अधिकारी संजीव कुमार यांनी याबाबत घोषणा केली आहे. या 15 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार असून 9 डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 11 नोव्हेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार असल्याचे संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात कॉंग्रेस नेत्यांनी बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे नेते सिद्धरामैय्या, बीके हरिप्रसाद, डीके शिवकुमार आणि दिनेश गुंडू राव उपस्थित होते.
कर्नाटकात सत्ता गमावलेल्या काँग्रेस-जद(एस) आघाडीने पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आपल्याच १७ आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून ‘अपात्र’ घोषित करून घेतल्याने नव्याने मुख्यमंत्री झालेल्या भाजपच्या बी.एस. येडियुरप्पा यांची खुर्ची बहुमत सिद्ध करण्याआधीच बळकट झाली होती. त्यानंतर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव येण्याआधीच हे आमदार अपात्र ठरल्याने काँग्रेस-जद(एस)चे सरकार कोसळले होते व भाजपला बहुमत सिद्ध करणे सहज सोपे झाले होते.