नवी दिल्ली: दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत आज (गुरुवारी) सकाळी किरकोळ घट झाल्याचे समोर आले आहे. यामुळे दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाणार असला तरी प्रदूषणाची गुणवत्ता पातळी अजूनही खराब आहे.
भारत हवामान खात्याच्या (आयएमडी) शास्त्रज्ञांनी सांगितले की, आज दिवसभर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी करण्यास मदत होईल. तसेच दिवस वाढत जाईल तसे आपल्याकडे जोरदार वारा आणि शहराच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस पडल्यास हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असल्याचे मत आयएमडीमधील ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणाले.
1 नोव्हेंबर रोजी शहरात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (ईपीसीए) जाहीर केले. शाळा बंद करणे आणि बांधकाम उपक्रमांवर बंदी घालणे यासारख्या उपायांवर कारवाई करावी लागली. प्रदूषणाची पातळी सुधारल्यानंतर बुधवारी राष्ट्रीय राजधानीतील शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
दिल्ली सरकारने गेल्या काही दिवसांपासून खासगी गाड्यांसाठी सम-विषम योजना लागू केली आहे. दिल्लीतील गाड्यांमधून होणारे प्रदूषण आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये पराली अर्थात धसकटं जाळली जातात. त्यामुळे दिल्लीच्या हवामानावर त्याचा गंभीर परिणाम होतो. आजूबाजूच्या राज्यांमध्ये हिवाळा सुरू झाला की धसकटं जाळली जातात. यावर बंदी असतानाही ते केले जात असल्याने त्याचा परिणाम दिल्लीच्या हवेवर होतो. त्यामुळे या प्रकरणी सर्व संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना जबाबदार धरले गेले पाहिजे, अशी मागणी पर्यावरण संवर्धन आणि नियंत्रण प्राधिकरणाचे अध्यक्ष भुरे लाल यांनी न्यायालयात केली आहे.