मोहाली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था उतरणीला लागली, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केले. या धाडसाची तांत्रिक वा आर्थिकदृष्ट्या काहीच गरज नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले.मोहाली येथील इंडियन स्कूल आॅफ बिझनेस लीडरशिप समिटमध्ये डॉ. सिंग म्हणाले की, जेव्हा तुम्ही चलनातील तब्बल ८६% नोटा मागे घेता वा एका रात्रीत बाद ठरवता, तेव्हा सध्या दिसत आहेत, तसे परिणाम अटळच असतात.जीएसटीविषयी बोलताना माजी पंतप्रधान म्हणाले की, या करपद्धतीमुळे आपल्याला भविष्यात त्याचे फायदे दिसतील. मात्र त्यासाठी त्यात तात्काळ काही बदल करणेही गरजेचे आहे. सध्याच्या जीएसटीमध्ये अनेक त्रुटी असून, त्याचा लोकांना त्रास तर सहन करावा लागतच आहे, शिवाय अर्थव्यवस्थेलाही फटका बसल्याचे जाणवत आहे.डॉ. सिंग यांनी आपल्या काळातील आर्थिक स्थितीचा आकडेवारीसह आढावाही घेतला. ते म्हणाले की, आम्ही सत्तेत असताना गुंतवणुकीचा दर ३५-३७ टक्के होता. आता तो ३0 टक्क्यांवर आला आहे. खासगी गुंतवणुकीत वाढ होतानाच दिसत नाही. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातही गुंतवणूक होण्याची मोठी गरज आहे. मात्र विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ सार्वजनिक क्षेत्रावर विसंबून राहता येणार नाही. आपल्याला परकीय चलनाकडेही लक्ष द्यावे लागेल. (वृत्तसंस्था)सार्वजनिक आरोग्यावर खर्च आवश्यककेंद्र सरकार सार्वजनिक आरोग्यावर पुरेसा खर्च करत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करून डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, पायाभूत सुविधा व सार्वजनिक आरोग्य यांच्यावर भर देण्याची गरज आहे.
अर्थव्यवस्थेची घसरण नोेटाबंदीमुळेच, जीएसटीमधील त्रुटी तात्काळ दूर व्हाव्यात - डॉ. मनमोहन सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 5:50 AM