चिदंबरम यांचा हल्लाबोल : ना रोजगार, ना उद्योगनवी दिल्ली : जे ‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन दिले होते, ते ‘अच्छे दिन’ कुठे आहेत, असा थेट सवाल माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या सरकारची वर्षपूर्ती साजरी करीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी केला. रोजगार आणि विकासाबाबत मोठमोठ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या; पण आज ना रोजगार आहे, ना विकास. यालाच ‘अच्छे दिन’ म्हणायचे काय, असे चिदंबरम म्हणाले. तसेच जुन्याच योजनांच्या नव्याने पुड्या बांधून हे सरकार त्याचा डंका पिटत आहे, असाही त्यांनी आरोप केला. पंतप्रधान मोदी हे प्रचार करण्यात तरबेज आहेत. त्यांचे सरकार गोष्टीदेखील मोठ्यमोठ्या करते. त्यामागे या सरकारचा चांगला विचार असेल, असे गृहीत धरतो. परंतु हे सरकार लक्ष्य कसे गाठणार, ही माझी चिंता आहे. जी पावले उचलली पाहिजेत, ती वित्तमंत्री अरुण जेटली अजिबातच उचलताना दिसत नाहीत, अशा शब्दांत चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली. ते पुढे म्हणाले, की गुंतवणूकदार संभ्रमात असल्यामुळेही आम्ही चिंतित आहोत. काय करावे, हे गुंतवणूकदारांना कळेनासे झाले आहे. त्यामुळे ‘क्रेडिट ग्रोथ’ थांबली आहे. मोदी सरकारला आपण दहापैकी किती गुण देणार, असे विचारले असता चिदंबरम म्हणाले, की जर तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलत असाल तर मी शून्य गुण देईन. प्रख्यात अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी यांनीही मोदी सरकारला शून्य गुण दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)गरम हवेचा फुगागरम हवा भरलेला फुगा फार काळ उडविता येणार नाही, अशी बोचरी टीकाही चिदंबरम यांनी मोदी सरकारवर केली. तसेच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून सरकारवर तोफ डागली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत घट झाली आहे. परंतु त्याचा लाभ सामान्य ग्राहकांना मिळवून दिला जात नाही. खनिज तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्याने ५० हजार कोटी रुपयांचा लाभ ग्राहकांना मिळायला हवा होता. परंतु मोदी सरकारने कर वाढवून हे ५० हजार कोटी रुपये वसूल केले आहेत, असा युक्तिवाद चिदंबरम यांनी या वेळी केला.ही कसली योजना ? कोळसा खाणींच्या लिलावावर भाषणे देण्यात आली; परंतु हेच मोदी सरकार आता कोळसा आयात करीत आहे. अखेर ही कसली योजना आहे? निर्यातीत प्रचंड घट झालेली आहे, जी मागील २० वर्षांतील सर्वांत मोठी घट आहे, असही चिदंबरम म्हणाले. मोदी सरकारचे निर्णय योग्य आहेत की अयोग्य, हे येणारा काळच सांगेल. आम्ही सरासरी ८.५% विकासदर दिला होता. एवढा विकासदर कोणतेच सरकार देऊ शकलेले नाही. - पी. चिदंबरम
काम कमी, पण... डंकाच जास्त!
By admin | Published: May 26, 2015 2:20 AM