नवी दिल्ली: पंजाबी अभिनेता दीप सिद्धू (Deep Sidhu) याचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी दिल्लीहून पंजाबला जात असताना दीपच्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, त्याचा जागीच मृत्यू झाला. धडकेत गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे फोटो पाहायला मिळत आहेत.
पंजाबला येत असताना कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस वेवर पिपली टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिल्यानंतर दीप सिद्धू चर्चेत आला होता. दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये घडलेल्या प्रकरणातही तो आरोपी होता. त्या प्रकरणात दीपला काही महिने तुरुंगातही जावे लागले होते. सध्या तो जामीनावर बाहेर होता.
कोण होता दीप सिद्धू?दीप सिद्धू हा पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्याचा रहिवासी होता. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने किंगफिशर मॉडेल हंट अवॉर्ड जिंकला होता. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 2015 मध्ये त्याचा पहिला सिनेमा ‘रमता जोगी’ रिलीज झाला. मात्र सिद्धूला 2018 मधील ‘जोरा दास नम्ब्रिया’ या पंजाबी चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.
लाल किल्ला हिंसाचाराचा आरोप
गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणात अभिनेता दीप सिद्धूचे नाव समोर आले होते. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. जामीन अर्जात दीप सिद्धूने न्यायालयात स्वतःला निर्दोष असल्याचे म्हटले होते.