लग्नानंतर बहुतेक महिलांचे आयुष्य हे काही गोष्टींपुरतच मर्यादित असतं. मुलं झाल्यानंतर त्यांचं जीवन बदलतं. मुलांसाठी वेळ जातो. स्वतःसाठी वेळ काढणं आणि आपले ध्येय साध्य करणं हा विचार देखील त्या सहसा करत नाहीत. पण दीपा भाटी यांची यशोगाथा वेगळी आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे.
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील कोंडली बांगर गावातील एका गुर्जर कुटुंबातील दीपा भाटी ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी हे सिद्ध केलं आहे की, जर तुम्ही मनाशी एखादी गोष्ट ठरवली तर कोणतेही ध्येय अवघड नसते. आपल्या ध्येयासाठी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कठोर परिश्रम करता येतात. ते साध्य करून दाखवताही येतं.
तीन मुलांची आई असलेल्या दीपा भाटी लग्नाच्या 18 वर्षांनंतर पुन्हा पुस्तकांशी जोडल्या गेल्या. मेहनत करण्यात कुठलीही कमतरता ठेवली नाही. पतीचाही आधार मिळाला. सासरच्यांनीही साथ दिली. मुलांनीही आईला प्रोत्साहन दिले. याचाच परिणाम असा झाला की 2021 मध्ये दीपा भाटी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाली.
सध्या नोएडाच्या Eldeco Green Meadows सोसायटीत राहणाऱ्या दीपा भाटी यांनी UPPSC 2021 मध्ये 166 वा क्रमांक मिळवून लग्नानंतरही यश मिळवता येतं हे सिद्ध केलं आहे. प्रगतीचे नवीन मार्ग शोधता येतात. आता केवळ कुटुंबालाच नाही तर संपूर्ण गुर्जर समाजाला दीपा भाटी यांचा अभिमान आहे.
दीपा भाटी यांनी नुकत्याच एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, लग्नाच्या 18 वर्षांनंतर यूपीपीएससीची तयारी करताना तिला खूप टोमणे ऐकायला मिळायचे. लोक म्हणायचे की म्हातारपणी तयारी करून काहीच होत नाही, पण मी फक्त माझंच ऐकलं. कष्ट करणं सोडले नाही. कदाचित यामुळेच मी वयाच्या 40 व्या वर्षीही यूपीपीएससी पास केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.