टोंक - राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात इन्स्टाग्रामवर रिल बनवून लोकांना हसवणाऱ्या मुलीला कोब्रा सापानं डसल्यानं जीव गेला आहे. दीपा असं या मुलीचं नाव असून तिच्या मृत्यूनं गावात शोककळा पसरली आहे. दीपाच्या अचानक जाण्यानं तिचे फॉलोअर्सही दु:खी झालेत. घाड परिसरात राहणाऱ्या दीपा साहूनं अलीकडेच १४ जुलैला एक रिल बनवली होती. ती इन्स्टाग्रामवर शेअर करत हजारो लाईक्स मिळवले होते.
चार भावंडांमध्ये दीपा दुसऱ्या क्रमांकाची होती. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय होती. कायम रिल बनवून ती पोस्ट करायची. सकाळी ६ वाजता घरच्या गाईंसाठी चारा घेण्यासाठी गेली असताना तिला सापाने दंश दिला. कोब्रा जातीचा हा साप होता. दीपा जोरात ओरडल्याने घरातील आणि आसपासची लोक तिथे पोहचली आणि त्या सापाला मारून टाकलं. दीपाच्या शरीरात सापाचं विष पसरत असल्याने लोकांनी तिला तातडीनं कोटा इथं उपचारासाठी नेले परंतु हॉस्पिटलला पोहचण्याआधीच दीपाचा मृत्यू झाला.
दीपाच्या मृतदेहावर कोटा इथं पोस्टमोर्टम करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला. गावात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जर दीपाला सर्पदंशानंतर एक तासाच्या आत जवळच्या सीएचसी अथवा देवली येथील ट्रॉमा हॉस्पिटलला नेले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता असं स्थानिक लोक सांगतात. कोब्रा साप हा टॉप १० विषारी सापांपैकी एक आहे. संशोधनानुसार, सापाच्या न्यूरोटॉक्सिक विषामुळे पीडित व्यक्तीच्या मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होतो. त्याचा परिणाम श्वास आणि हृदयावर होतो. वेळेत उपचार न मिळाल्यास संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो.
'तो' १ तास महत्त्वाचा
ब्लॅक कोब्राच्या दंशानंतर जीव वाचण्यासाठी १ तास महत्त्वाचा असतो असं डॉक्टरने सांगितले. दीपाला १ तासांत कुठल्याही जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले असते आणि तिला एंटी वेनम सीरम दिली असती तर तिचा जीव वाचला असता. एंटी वेनम सीरम ही सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध केली जाते. दीपाला साप चावल्यानंतर तिच्या घरच्यांनी नजीकच्या रुग्णालयात न जाता कोटा येथे तिला आणलं. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. कोटा इथं जाणाऱ्या रस्त्यातच दीपानं जीव सोडला.