अयोध्येमध्ये दिवाळीचा महोत्सव सुरु झाला आहे. राम मंदिराच्या निर्माणामुळे यंदाची दिवाळी मोठी साजरी केली जात आहे. शरयू नदीकाठी लेझर शोचे देखील आयोजन करण्यात आले होते. सारी अयोध्यानगरी रामनामाच्या गजराने दुमदुमली आहे.
शरयू नदीकाठीच्या लेझर शोमध्ये रामायणातील प्रसंग दाखविण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. आदित्यनाथांनी रामलल्लाची पूजा केली. यानंतर त्यांनी शरयू नदीकाठी आरती करत जमलेल्या हजारो लोकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. तसेच पुढील वर्षी 7 लाख 51 हजार दिवे लावले जाणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल या देखील उपस्थित होत्या. राम मंदिराचे भूमीपूजन झाल्यानंतर, वीट ठेवल्यानंतर पहिल्यांदाच दिवाळी साजरी केलजी जात आहे. यासाठी योगी यांनी मोदींचे आभार मानले.
अयोध्येमध्ये तीन दिवस दिपोत्सव साजरा केला जाणार आहे. याची सुरुवात आज झाली. राम घाटाचा विस्तार केला जात आहे. यामुळे पुढील वर्षी जास्त दिवे लावले जाणार आहेत. योगी सरकार आल्यानंतर अयोध्येमध्ये दरवर्षी दिवाळी साजरी केली जात आहे. लाखो दिवे लावून अयोध्या उजळून निघते.