गुना: मध्य प्रदेशातील गुना येथे शनिवारी(दि.14) पहाटे 3 ते 4 च्या सुमारास काळ्या हरणांची शिकार करण्यासाठी आलेले शिकारी आणि पोलिसांमध्ये भीषण चकमक झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेत एका SI सह तीन पोलीस शहीद झाले तर प्रत्युत्तरात दोन हल्लेखोर शिकाऱ्यांना ठार करण्यात आले होते. आता या प्रकरणातील पळून गेलेल्या तिसऱ्या आरोपीचाही एनकाउंटर करण्यात आला आहे. तसेच, इतर चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
शनिवारी घडलेल्या घटनेनंतर सरकारने कठोर पाऊले उचलली होती. या घटनेतील आरोपींच्या घरावर बुलडोझर चढवण्यात आला होता. तसेच, इतर आरोपींच्या शोधासाठी जवळपास शंभर पोलिसांचे पथक कामाला लागले होते. दरम्यान, आज पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास पळून गेलेल्या आरोपीला तेजाजी चबुतरा परिसरात घेराव घालून शरण येण्यास सांगितले, पण आरोपी छोटू उर्फ जहीर याने पोलिसांवर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यात तो ठार झाला. यासह अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, अजून तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
नेमकी काय घटना आहे?मध्य प्रदेशातील गुना येथे शनिवारी पहाटे 3 ते 4 च्या सुमारास काळ्या हरणांची शिकार करण्यासाठी काही शिकारी आले होते. त्यांनी तीन हरीण आणि एका मोराची शिकारही केली. भाचीच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना हरणाचे मांस खाऊ घालण्यासाठी ही शिकार करण्यात आली होती. दरम्यान, हरणांचे मृतदेह घेऊन जाताना आरोपींचा पोलिसांशी सामना झाला. यानंतर आरोपींनी पोलिसांवर गोलीबार केला, यात तीन पोलिसांचा मृत्यू झाला.
तीन चकमकी, तीन आरोपी ठारपोलिसांच्या प्रत्युत्तरात आरोपी शिकारी नौशाद तिथेच मारला गेला, तर त्याचा साथीदार शहजाद शेजारील गावात झालेल्या चकमकीत ठार झाला. या घटनेनंतर पोलिस तिसऱ्या साथीदाराचा शोध घेत होते. त्या तिसऱ्या साथीदाराला आज झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले आहे. अशाप्रकारे या संपूर्ण घटनेत नौशाद, शहजाद आणि जहीर यांना ठार करण्यात आले आहे.
शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदतया घटनेत इन्स्पेक्टर राजकुमार जाटव, कॉन्स्टेबल नीरज भार्गव आणि कॉन्स्टेबल संतराम शहीद झाले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.