नालंदा - देशातील कोरोना संकटात पावलो पावली माणूसकीचे दर्शन घडत आहे, तर अनेक ठिकाणी माणूसकीचा बळी जात असल्याचंही निदर्शनास येत आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांचे मृतदेह एकाच गाडीत कोंबल्याचं आपण पाहिलं. रुग्णालयातून बिलाचा भरणा न केल्यामुळे मृतदेह तासन-तास नातेवाईकांच्या ताब्यात न दिल्याचंही आपण पाहिलं. आता, बिहारमधीलनालंदा येथे चक्का कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
देशात कोरोनाची विदारक परिस्थिती पाहायला मिळत असून उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीच्या प्रवाहात अनेक मृतदेह वाहत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि वाचल्या आहेत. कोरोनाबाधित मृतदेहांची अशी विटंबना होत असून परिस्थिती धक्कादायक बनत आहे. रुग्णालय प्रशासन आणि नातेवाईकांमध्येही चांगलेच वाद होताना दिसत आहेत. कुठे इंजेक्शनची कमतरता, कुठे ऑक्सिजनची कमतरता, कुठे बेडची कमतरता दिसून येत आहे. त्यातच आता स्मशाभूमीतही रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं आहे. बिहारच्या नालंदा येथील सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महापालिकेच्या कचरा गाडीतून कोरानामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. पीपीई कीट घालून दोन व्यक्तींनी चक्क कचऱ्याच्या गाडीत हा मृतदेह टाकला होता. विशेष म्हणजे ही गाडी तीन चाकी रिक्षा सायकल होती. त्यामध्ये, एक व्यक्ती गाडीला पाठिमागून ढकलत होता, तर एकाने सायकलचा हँडल पुढे धरलेला दिसत आहे. मृतदेहाची अशी विटंबना झाल्याने सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी ही घटना घडली असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.