मला गप्प बसविण्यासाठी विरोधकांकडून बदनामीचे खटले - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 04:15 AM2019-10-11T04:15:59+5:302019-10-11T04:20:02+5:30
नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी... या सर्वांचे मोदी हेच समान आडनाव कसे काय? सर्वच चोरांचे आडनाव मोदी का असते? असे राहुल गांधी म्हणाले होते.
सुरत : मला गप्प बसविण्यासाठी राजकीय विरोधक बदनामीचे खटले दाखल करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली आहे. बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी ते गुरुवारी येथे आले होते.
नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी... या सर्वांचे मोदी हेच समान आडनाव कसे काय? सर्वच चोरांचे आडनाव मोदी का असते? असे राहुल गांधी म्हणाले होते. लोकसभा निवडणुकांत कर्नाटकत १३ एप्रिल रोजी झालेल्या प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यामुळे मोदी समाजाची बदनामी झाली आहे, असा आक्षेप घेत सुरतमधील भाजपचे आमदार पीयूष मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर खटला दाखल केला आहे.
आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. या खटल्याच्या पुढील सुनावणीला वैयक्तिकरीत्या हजर न राहण्याची सवलत मिळण्यासाठी राहुल गांधी यांनी केलेला अर्ज मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी १० डिसेंबरला आहे. या खटल्याच्या जुलैमध्ये झालेल्या सुनावणीस उपस्थित राहू शकणार नसल्याची राहुल गांधी यांनी केलेली विनंती न्यायालयाने मान्य केली होती. त्यानंतर पुढील सुनावणी १० आॅक्टोबर रोजी ठेवली होती. राहुल गांधी यांच्या सूरत दौºयाच्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. (वृत्तसंस्था)
भिवंडीत न्यायालयातही खटला
- रा. स्व. संघाची बदनामी केल्याचा आरोप करीत भिवंडीतील न्यायालयातही राहुल गांधी यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.
- रा. स्व. संघाच्या लोकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली आणि आता भाजपचे लोक गांधीजींच्या नावाचा वापर करीत असतात.
या लोकांनी सरदार वल्लभभाई पटेल व गांधीजींना विरोध केला होता, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान भिवंडीतील प्रचारसभेत केले होते.