लखनऊ: गोरखपूर, फुलपूर पाठोपाठ कैराना लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या पराभवानंतर उत्तर प्रदेशात नोएडाच्या भुताची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मानगुटीवर नोएडातील 'ते' भूत बसलंय का?, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. नोएडाला भेट देणारा मुख्यमंत्री निवडणुकीत पराभूत होतो किंवा त्याला खुर्ची सोडावी लागते, अशी एक अंधश्रद्धा उत्तर प्रदेशात आहे. ही अंधश्रद्धा मोडून काढण्याचं धाडस गेल्या डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दाखवलं. त्यांनी नोएडाला भेट दिली. मात्र तेव्हापासून झालेल्या चार निवडणुकांमध्ये आदित्यनाथ यांना भाजपाला यश मिळवून देता आलेलं नाही. नोएडाचा दौरा करणाऱ्या मुख्यमंत्र्याला खुर्ची सोडावी लागते, या अंधश्रद्धेची सुरुवात 1980 च्या दशकात झाली. त्यावेळी वीर बहादूर सिंह यांना नोएडाला भेट दिली होती. नोएडावरुन परत येताच त्यांना पक्षानं मुख्यमंत्रिपदावरुन हटवलं होतं. यानंतर उत्तर प्रदेशच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी नोएडाला जाणं टाळलं. राजनाथ सिंह मुख्यमंत्री असताना त्यांनीही नोएडाचा दौरा केला नव्हता. 2011 मध्ये मेट्रो सेवेच्या उद्घाटनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मायावती नोएडाला गेल्या होत्या. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत मायावती यांना पराभूत व्हावं लागलं. मायावती यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनीही नोएडाला जाणं टाळलं. अखिलेश यांच्या कार्यकाळात एनसीआरमधील एका मोठ्या उद्घाटनाचं उद्घाटन झालं. मात्र अखिलेश यांनी नोएडाचा इतका धसका होता की, त्यांनी लखनऊमधील त्यांच्या निवासस्थानावरुन नोएडातील प्रकल्पाचं उद्घाटन केलं. मात्र तरीही 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपानं अखिलेश यादव यांचा पराभव केला.
नोएडाचं 'ते' भूत योगी आदित्यनाथांच्या मानगुटीवर बसलंय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 1:15 PM