लोकसभेच्या निवडणुकीत सर्वत्र मोदींची हवा असताना आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांनी लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाची धूळधाण उडविली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाची स्थिती दयनीय झाली आहे. लोकसभेच्या सर्व २५ जागांवर वायएसआर पक्षाने निर्णायक आघाडी घेतली आहे.
एकही जागा तेलुगू देसम पक्षाला मिळाली नाही. सुमारे ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवून जगनमोहन यांचा पक्ष आघाडीवर राहिला आहे. वायएसआर काँग्रेसने सर्व १३ जिल्ह्यांत आपले स्थान मजबूत केले आहे. येत्या २५ मे रोजी जगनमोहन रेड्डी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होईल. ३० मे रोजी जगन हे शपथ घेतील असे सांगण्यात आले.
डीएमके - काँग्रेस आघाडीने तामिळनाडूत लोकसभा निवडणुकीत क्लीन स्विप केले आहे. त्याचप्रमाणे विधानसभा पोटनिवडणुकीतदेखील १२ जागांवर आघाडी घेतली. राज्यातील प्रमुख द्रविडीयन पक्षांसोबत काँग्रेस व भाजपने आघाडी करून येथे निवडणूक लढवली तर टीटीव्ही दिनकरन यांच्या एएमएमके आणि कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम पक्षाने स्वबळावर जनमत आजमावत निवडणुकीत रंग भरले होते. त्यात द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन हेच किंग ठरले आहेत.