गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ होत आहे. दरम्यान, मणिपूरमधील दंगे आणि दोन महिलांची काढण्यात आलेली विवस्त्र धिंड यावरून विरोधक अधिकच आक्रमक झाले असून, केंद्रातील मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. संख्याबळाचा विचार करता या अविश्वास प्रस्तावामुळे केंद्रातील मोदी सरकारला कुठलाही धोका निर्माण होणार नाही. या प्रस्तावावरील मतदानामध्ये विरोधी पक्षांचा पराभव होणार हे निश्चित आहे. मात्र तरीही हा प्रस्ताव आणण्यामागे विरोधी पक्षांची एक व्यापक रणनीती आहे. त्यातील पाच प्रमुख कारणं पुढील प्रमाणे.
पंतप्रधान मोदींना बोलण्यास भाग पाडणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन बाळगतात, असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. अदानी-हिंडेनबर्ग, महिला कुस्तीपटूंचा मुद्दा, मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड या सर्व प्रकरणात मोदींनी मौन बाळगलं होतं. अशा परिस्थितीत अविश्वास प्रस्ताव आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलण्यास भाग पाडणं आणि गंभीर मुद्द्यांवर बोलणं टाळणाऱ्या पंतप्रधानांना विरोधी ऐक्याने बोलण्यास भाग पाडलं, असा प्रचार करणं हा या अविश्वास प्रस्तावामागचा प्रमुख हेतू आहे.
मणिपूरच्या मुद्द्यावर वातावरणनिर्मिती करणंगेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. येथे मैतेई आणि कुकी यांच्यात संघर्ष सुरू आहे. यात आतापर्यंत १३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दोन महिलांना विवस्त्र करून फिरवण्यात आल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यावरूनही संतापाची लाट उसळी होती.
INDIA या नव्या आघाडीची शक्ती दाखवणेविरोधी पक्षांनी एकत्र येत INDIA ही नवी आघाडी स्थापन केली आहे. विरोधक म्हणून एकत्रितपणे सरकारला आव्हान देण्याची विरोधी आघाडीची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न या अविश्वास प्रस्तावामधून केला जात आहे.
२०२४ साठी मोदींविरोधात अजेंडा सेट करणेपुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अजेंडा सेट करण्यासाठी विरोधी पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. आता काँग्रेसचे अविश्वास प्रस्ताव आणून तोच प्रयत्न केला आहे. मणिपूरमधील हिंसाचारासह राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द करणं, कुस्तिपटूंचं आंदोलन, बेरोजगारी या सर्व मुद्द्यांवरून वातावरणनिर्मिती करून २०२४ साठी मोदींविरोधात अजेंडा तयार करून मोदींविरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.
पूर्वोत्तर भारतात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्याच प्रयत्नपूर्वोत्त भारतातील राज्ये हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ नंतर भाजपाने या भागात काँग्रेसला पुरतं खिळखिळं करून टाकलं आहे. आता मणिपूरचा मुद्दा पुढे करून आपला जनाधार परत मिळण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मोदींनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पूर्वोत्तर भारताकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र आता मणिपूरच्या मुद्द्यावरून त्यांना घेरण्याची संधी काँग्रेसला मिळाली आहे.