नुकत्याच झालेल्या ईशान्य भारतातील तीन राज्यांमधील निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे भाजपाचा उत्साह वाढला आहे. मात्र दक्षिणेतील मोठं राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये भाजपाला पराभवाचा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये यावर्षी मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित असून, काँग्रेसला २२४ पैकी १४० जागा मिळण्याची शक्यता आहे, असा दावा काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये करण्यात आला आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे भाजपामधील अनेक विद्यमान आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.
डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत भाजपाचे दोन माजी आमदार आणि म्हैसूरच्या माजी महापौरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये भाजपाचे माजी आमदार जी. एन. नानजुंदस्वामी, विजापूरचे माजी आमदार मनोहर ऐनापूर आणि म्हैसूरचे माजी महापौर पुरुषोत्तम यांचा समावेश आहे. यावेळी शिवकुमार यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या दणदणीत विजयाचं भाकित केलं.
भाजपाला २०२२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर भाजपाला लगेच कर्नाटकमध्ये निवडणुका घ्यायच्या होत्या. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. आधीच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये काँग्रेसला १३६ जागा मिळतील, शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता नव्या सर्व्हेक्षणामध्ये काँग्रेसला १४० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२०१८ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आले होते. त्यानंतर काँग्रेसने जनता दल सेक्युलर पक्षाला पाठिंबा देत कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. मात्र अनेक वादविवादानंतर वर्षभरातच हे सरकार कोसळले होते.