ऑनलाइन लोकमत
फैजाबाद, दि. २४ - अयोध्येतील काझियाना भागामध्ये काही स्थानिक मुस्लिमांनी बाबरी मशिदीची थर्माकॉलची प्रतिकृती उभारली होती. जिल्ह्यातील अधिका-यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन बाबरीची ती प्रतिकृती हटवली. या घटनेकडे कारसेवकपूरममध्ये राम मंदिरासाठीच्या शिळा ठेवण्यात आल्याची प्रतिक्रिया म्हणून पाहिले जात आहे.
मंदिर-मशिदीच्या वादग्रस्त जागेपासून जवळच ही प्रतिकृती उभारण्यात आली होती. पोलिसांनी नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अयोध्येतील वाद पुन्हा उफाळून येऊ नये यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अधिका-यांना सर्तक रहाण्याच्या सूचना केल्या आहेत.
या घटनेनंतर अयोध्येमध्ये सुरक्षा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. ६ डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्यानंतर देशातील अनेक भागात जातीय दंगली झाल्या होत्या. ज्यात अनेक निष्पाप नागरीकांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते.