श्रीनगर - सीमेपलीकडून पाकिस्तानमधून भारतात होणारे घुसखोरीचे प्रयत्न नियंत्रण रेषेवर सज्ज असलेले भारतीय जवान सातत्याने हाणून पाडत आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला बारामुल्लामधून अटक करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरवण्याच्या उद्देशाने घुसलेल्या दहशतवाद्याला सुरक्षा दलाने जिवंत पकडल्याची माहिती मिळत आहे.
सुरक्षा दलाने रविवारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. संरक्षण विशेषज्ञ कमर आगा यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या दहशतवाद्याला जिवंत पकडणे ही सुरक्षा दलासाठी खूपच मोठी कामगिरी आहे. पकडलेल्या दहशतवाद्याच्या चौकशी दरम्यान दहशतवाद्यांचे नेटवर्क आणि योजनांबाबत माहिती मिळू शकते. तसेच कटांमध्ये कोण कोण सहभागी आहे याचीही माहिती मिळेल.
मेजर जनरल (निवृत्त) पी. के. सहगल यांनीही सुरक्षा दलाला मोठे यश मिळाल्याचे म्हटले आहे. कोणत्याही मोहिमेमध्ये दहशतवाद्याला जिवंत पकडणे हे फारच मोठे आव्हान असतं असं सहगल यांनी म्हटलं आहे. रविवारी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशवाद्याला अटक करत त्याच्याकडून हत्यारे हस्तगत केली. दहशतवादी मोहसिन मंजूर सालेहा हा जुने शहर बारामुल्लाचा आहे. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने नवे कारस्थान आखल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी घडवण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. मात्र सिंधू खोऱ्यातील गुरेज विभागातून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले आहे. या भागातून जवळपास सहा वर्षांनंतर घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. लष्करामधील सूत्रांनी सांगितले की, घुसखोरीची ही घटना 27 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजी घडली. गेल्या काही वर्षांपासून सिंधू खोऱ्याचा भाग बऱ्यापैकी शांत आहे. येथे दहशतवादाविरोधातील शेवटची मोहीम 2013 मध्ये चालवण्यात आली होती. दरम्यान, ''नियंत्रण रेषेच्या प्रत्येक बाजूने दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यामुळे खोऱ्यातील लोक दहशतीच्या छायेत आहेत.