नवी दिल्ली: काँग्रेस सरकारला संरक्षण विभागाच्या गरजा कधीही समजल्या नाहीत. यासाठी त्यांनी आपल्या शेजारी देशांकडून धडा घ्यावा, असा सल्ला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल डीलवर भाष्य करताना दिला. आम्ही संरक्षणासाठी डील करतो. ते संरक्षणाचं डील करतात, अशी खरमरीत टीका सीतारामन यांनी काँग्रेसवर केली. राफेल डीलसाठी 8 वर्षे का लागली आणि यानंतरही एकही राफेल विमान भारतात का आणता आलं नाही?, असे प्रश्न संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसला विचारले. संसदेत गेल्या काही दिवसांपासून संसदेत राफेल डीलचा मुद्दा गाजतो आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हा मुद्दा सतत लावून धरला आहे. परवा राहुल गांधींनी राफेल डीलवरुन थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. राफेल डीलबद्दल मोदींनी 20 मिनिटं चर्चा करावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या आरोपांना आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं. मी आणि सरकार राफेल डीलसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. मात्र आमच्या उत्तरांची काँग्रेसला भीती वाटते, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसला 2014 पर्यंत राफेल डील पूर्ण का करता आलं नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसला त्यांच्या कार्यकाळात एकही विमान देशात का आणता आलं नाही, याचंही उत्तर त्यांनी द्यावं, असं आव्हान संरक्षणमंत्र्यानी द्यावं. 'चीननं त्यांच्या ताफ्यात जवळपास 4 हजार विमानं दाखल केली आहेत. मात्र काँग्रेसनं याच कालावधीत काय केलं? ज्या 126 विमानांचा उल्लेख केला जात आहे, ती कुठे आहेत?', अशा प्रश्नांच्या फैरी संरक्षणमंत्र्यांनी झाडल्या. त्यांच्या निवेदनादरम्यान काँग्रेस खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. देशाच्या चारही बाजूंना संकटं आहेत. परिस्थिती अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे आपण प्रत्येक संकटासाठी सज्ज राहायला हवं, असं सीतारामन म्हणाल्या.